भात लागवडीच्या कामांना वेग
लावणी करताना गायल्या जाणाऱ्या आंबोळ्या हरवल्या
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- जिल्ह्यात दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील मजूरवर्ग भात लावणीच्या कामात गुंतला आहे. पूर्वी भात लावणीची कामे करत असताना, विरंगुळा म्हणून पारंपारिक गाणी म्हटली जात होती. या गाण्यांना ‘आंबोळ्या’ असे संबोधले जात होते. मात्र, या आंबोळ्यांचा सूर आता खलाट्यांमध्ये हरवला आहे.
अलिबाग तालुक्यातील रामराज, रेवदंडा, चोंढी, हाशिवरे,पोयनाड, कुर्डूस, सह खारेपाठ विभागातील परिसरात भात लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आपल्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पावसाने रायगडकरांना झोडपून काढले होते. त्यामुळे भात पेरणीची कामे व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे भातरोपांची उगवण हि चांगल्या प्रकारे झाली नव्हती. त्यामुळे रोपे देखील कमकुवत झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुबार भात रोपांची पेरणी करून, सध्या लावणी योग्य अशी रोपे तयार केली आहेत. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अधूनमधून पडणाऱ्या किरकोळ सरींमुळे भातरोपांनी तग धरून ठेवला होता. अशा अवस्थेत भातरोपांची स्थिती असतानाच, पावसाने जिल्ह्यात हजेरी लावून बरसायला सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र शेतात चांगले पाणी झाले आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे.
आंबोळ्याचे सुर खलाट्यांमध्ये हरवले
आता भात रोपांची चांगली वाढ झाली आहे. चिखलणीसाठी जमीन हलकी झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी करून भातरोपांच्या लावणीलाही सुरुवात केली आहे. अलिबाग तालुक्यातील महिलावर्ग सध्या लावणीच्या कामात मग्न झाला आहे. पूर्वी लावणीची कामे करत असताना विरूंगळा म्हणून पारंपरिक गाणी गाऊन, त्यातून देवाची आळवणी केली जात होती. अशा गाण्यांना ‘आंबोळ्या’ असे संबोधले जाते. परंतु, या आंबोळ्यांचे सूर आता खलाट्यांमध्ये ऐकू येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.