पराग कमलाकर पाटील यांचे दुःखद निधन

पराग कमलाकर पाटील यांचे दुःखद निधन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- गोंधळपाडा, अलिबाग येथील पराग कमलाकर पाटील यांचे दि. १६ जुलै २०२५ रोजी कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्ष एवढे होते. अत्यंत प्रेमळ, मितभाषी, हसतमुख असलेल्या पराग पाटील यांचे एवढ्या कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जे. एस. एम. कॉलेजचे माजी प्राचार्य, डॉ. अनिल पाटील यांचे ते छोटे बंधू होते.

सुरवातीच्या काळात ते कोकण एजुकेशन सोसायटीच्या पेण येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांनतर त्यांनी स्वतःचा गार्डन आणि फार्म डेव्हलपमेंट तसेच ठिबक सिंचन याचा स्वतंत्र उद्योग सुरु केला होता. अतिशय मेहनतीने त्यांनी या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अत्यंत सुबक पद्धतीने व सचोटीने काम करणारा माणूस म्हणून ते ओळखले जात होते. आपल्या या उद्योगातून त्यांनी ग्रामीण भागातील ८ ते १० तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. अलिबाग तालुक्यातील अनेक नामवंत उद्योजक, फिल्म स्टार व व्यावसायिक यांच्या फार्म डेव्हलोपमेंटचे काम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले होते एवढेच नवे तर मुंबई विमानतळ, म्हैसूर येथील इन्फोसिस कॅम्पस, गोवा येथील रिसॉर्ट येथील ठिबक व तुषार सिंचन चे काम त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केले होते. या सर्व वर्गातून श्री. पराग पाटील यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले जात आहे.

महाविद्यालयीन जीवनापासूनच पराग पाटील एक हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून सक्रिय होता. अलिबाग येथील महाविद्यालयात असताना तो एन. एस. एस. चा सिनियर लीडर होता तर अंतिम वर्षात जिमखान्याचा जनरल सेक्रटरी होता. क्रिकेट हा त्याचा आवडीचा विषय. महाविद्यालय, विद्यापीठ, रायगड जिल्हा अशा सगळ्या स्तरावरील क्रिकेट त्याने गाजवले होते. एक शांत डोक्याचा तडाखेबंद फलंदाज म्हणून त्याची प्रसिद्धी होती, त्याचबरोबर तो एक कुशल यष्टीरक्षक सुद्धा होता.

पराग पाटील यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा -सून व एक मुलगी असा परिवार आहे. अलिबाग येथील नगरपालिकेच्या स्मशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करणेत आले. या वेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अँड. गौतम पाटील, अँड. प्रवीण ठाकूर, अँड. जयेश जोशी, अँड. सुशील पाटील , संजय सावंत, अँड. महेश ठाकूर,अर्जुन पाटील, प्रा. सुरेंद्र दातार, जयंत धुळप, विविध क्षेत्रातील व्यक्ती,गोंधळपाडा व काचळी या मूळ गावातील ग्रामस्थ, इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पराग पाटील यांच्या क्रिकेट टीम मधील सहकारी व अलिबागेतील सिनियर क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी आपल्या या सहकार्याला क्रिकेटची बॅट अर्पण करून एक वेगळी श्रद्धांजली अर्पण केली.