युवा खेळाडूंची निराशाजनक कामगिरी…
भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारताने दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळली. भारताने या दौऱ्यात नवोदित युवा खेळाडूंना संधी दिली. या नवोदित खेळाडूंकडून भारताला चांगल्या कामगिरीची यापेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली कारण या दौऱ्यात नवोदित खेळाडूंनी तशी निराशाजनकच कामगिरी केली.
एकाही युवा खेळाडूने दर्जेदार कामगिरी करून लक्ष वेधून घेतले नाही. या दौऱ्यात भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका १ – ० ने जिंकली या दोन्ही सामन्यात एकाही नवोदित खेळाडूने दम दाखवला नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, अश्विन, जडेजा या अनुभवी खेळाडूंनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कसोटी मालिकेवर आपले नाव कोरले. त्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका भारताने २ -१ अशी जिंकली . एकदिवसीय मालिकेत अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.
युवा खेळाडूंचा भरणा असलेला हार्दिक पांड्याच्या या संघाकडून क्रिकेट प्रेमींना खूप अपेक्षा होती कारण वेस्ट इंडिजचा संघ हा तर अगदीच नवखा होता. दोन चार खेळाडू वगळता एकही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळलेला नव्हता. अगदी नवीन खेळाडूंचा हा संघ असल्याने आपण सहज ही मालिका जिंकू असे सर्वांनाच वाटले होते त्यात वेस्ट इंडिज संघ विश्व चषक स्पर्धेसाठीही पात्र ठरला नव्हता त्यामुळे भारत ३- ० ने मालिका जिंकेल असे वाटले होते मात्र तिथेही भारताच्या युवा खेळाडूंनी निराशा केली.
भारताने कशी बशी ही मालिका २-१ ने जिंकली मात्र नवोदित युवा खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींची निराशाच केली. टी २० मालिकेत तर वेस्ट इंडिजच्या युवा खेळाडूंनी भारताच्या युवा खेळाडूंची पार नाचक्कीच केली. पाच सामन्यांची मालिका वेस्ट इंडिजने ३- २ ने खिशात घातली. टी २० मालिकेत भारतीय युवा खेळाडूंनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात युवा खेळाडूंनी निराशा केली. भारताच्या युवा खेळाडूंकडून अशी निराशाजनक कामगिरी अपेक्षित नव्हती.
वास्तविक हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी नवोदित असले तरी त्यांना टी २० क्रिकेटचा मोठा अनुभव होता. सर्व युवा खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत मुळात त्यांची निवड आयपीएलच्या कामगिरीवरच झाली आहे असे असताना एकाही युवा खेळाडूने अपेक्षित कामगिरी केली नाही. ( अपवाद तिलक वर्मा ) या खेळाडूंमध्ये जिंकण्याची इर्षाच दिसली नाही आयपीएल खेळताना ज्याप्रमाणे हे खेळाडू जीव तोडून खेळतात तशा प्रकारचा खेळ एकाही खेळाडूकडून दिसला नाही. जर हे खेळाडू अशीच निराशाजनक कामगिरी करीत राहिले तर भारतीय क्रिकेटचे भविष्य चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल.
बीसीसीआयने या युवा खेळाडूंच्या या निराशाजनक कामगिरीचा गंभीरपणे विचार करावा. बीसीसीआय या खेळाडूंना सर्व सुविधा पुरवते मग हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर का चालू शकत नाही याबाबतचा विचार बीसीसीआयने करावा. युवा खेळाडूंचा या निराशाजनक कामगिरीला संघ व्यवस्थापन देखील तितकेच जबाबदार आहे. युवा खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी काढून घेण्यात संघ व्यवस्थापन अपयशी ठरले आहे. या सर्व बाबींचा बीसीसीआयने गंभीरपणे विचार करावा.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९९२२५४६२९५