*लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले; नागपुरात एकाच दिवशी ३ आत्महत्या*

करोनाच्या वायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका सर्वच क्षेत्रांत बसला. त्यातही हातावर पोट असलेला वर्ग यात सर्वाधिक होरपळला. त्यातून जो आजही सावरलेला नाही.

नागपूर:- लॉकडाऊन काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला. अनेकांना रोजगारास मुकावे लागले. त्यामुळे आर्थिक घडीच विस्कटून गेली. अशाचप्रकारे लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तीन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नागपुरात उघड झाले असून हळहळ व्यक्त होत आहे. या तीन वेगवेगळ्या घटना असल्या तरी बेरोजगारी हे यामागील एकच कारण असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पहिली घटना नागपूर शहरातील कपिलनगर म्हाडा क्वार्टर येथे आज सकाळी उघडकीस आली. योगेश नरेंद्र मोहोड (वय ३०) हा ऑटोरिक्षा चालवायचा. योगेश हा आई सहजा यांच्यासोबत राहायचा. लॉकडाऊनमुळे ऑटोरिक्षाचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे तो बेरोजगार झाला होता. नैराश्येतून त्याला दारुचे व्यसन जडले आणि त्यातच मंगळवारी रात्री योगेश याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. आज सकाळी सहजा यांना योगेश हा गळफास लावलेला दिसला. त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमले. माहिती मिळताच कपिलनगर पोलिस तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी योगेश याच्या भावाची हत्या करण्यात आली होती.
दुसरी घटना नंदनवनमधील मिरे ले-आऊट येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश धनराज लताड (वय २८) हा इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. तो बेरोजगार झाला. बेरोजगारीला कंटाळून बुधवारी सकाळी त्याने दुपट्ट्याने गळफास घेतला व जीवन संपवले.
तिसरी घटना हुडकेश्वरमधील गजानननगर परिसरात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास समोर आली. सूरज रमेश आसोले (वय ३०) यानेही पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. बेरोजगारीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तिन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here