आज १७ सप्टेंबर. थोर समाजसुधारक पेरियार यांची १४३ वी जयंती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी ह्यावर्षीपासून आजचा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करणार असल्याचे केले घोषित.
सिद्धांत
मुंबई दि. १७ सप्टेंबर २०२१: ज्यांना द्रविडीयन मुव्हमेंटचे फादर मानलं जात अश्या पेरियार यांचा आज जन्मदिवस. तमिळमध्ये पेरियार या शब्दाचा अर्थ होतो उच्च प्रतिष्ठा असलेली व्यक्ती. विसाव्या शतकात आपल्या सुधारणावादी सामाजिक आणि राजकीय कार्याने तामिळनाडूमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या समाजाची निर्मिती करण्याचे महान कार्य पेरियार यांनी केले. पेरियार यांचे एकूण जीवन म्हणजे जुन्या-पुराण्या रूढी परंपरा उध्वस्त करणाऱ्या कट्टर सुधारणावादी विचारसणीचे एक उत्तम उदाहरण आहे. देव अस्तित्वात नाही आणि जो कोणी तुम्हाला देवाची भीती घालतो तो लबाड आहे असे बोलणारे पेरियार पक्के नास्तिक होते. त्यासाठी काशी तीर्थक्षेत्राच्या यात्रेवेळी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग फार महत्वाचा आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा होता.
पेरियार यांची काशी यात्रा
१९०४ साली काशी तीर्थयात्रेच्या वेळी हिंदू धर्मातील जुन्या-पुराण्या रूढी परंपरा आणि ब्राम्हणीकरणाचा सामान्य भारतीयांवरील प्रभाव याचं प्रखर दर्शन पेरियार याना झालं. काशी इथे एका खानावळीत ते जेवणासाठी गेले असता ते उच्च जातीतील नसल्याने त्यांना जेवण देण्यास नकार देण्यात आला होता. त्यांचा अपमान करून त्यांना तिथून त्यांना बाहेर काढण्यात आले होते. या घटनांनंतर देवाचे अस्तित्व, देवाची भीती घालून समाजावर वर्चस्व गाजवणाऱ्यांच्या विरोधात लढण्यास त्यांनी सुरुवात केली.
स्त्रियांसाठी आणि तरुणांसाठी पेरियार यांचे क्रातींकारी विचार.
स्त्री हि पुरुषाची गुलाम नसून ती स्वतंत्र आणि समाजातील एक महत्वाची घटक आहे असे विचार मांडत त्यांनी आपल्या चळवळीमध्ये पुढाकार घेण्यासाठी अनेक स्त्रियांना प्रोत्साहन दिले. १९३८ ला चेन्नई येथे झालेल्या महिला सभेमध्ये मीनाबाल या महिलेने त्यांना सर्वप्रथम ‘पेरियार’ या नावाने संबोधले होते. स्त्रियांनाआपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. विवाह हे समाजाच्या दबावाखाली नव्हे तर वधू वरांच्या या दोघांच्या समंतीनुसारच व्हावे. तसेच आरोग्यदायी जीवन आणि समाजातील संतुलन राखण्यासाठी जोडप्यानी संततिनियमन पद्धतींचा योग्य वापर करावा असे आधुनिक विचार पेरियार यांनी १९३० सालीचं मांडले होते.
पेरियार आणि आंबेडकर
समाजातील अन्यायग्रस्त, मागासलेल्या लोकांच्या हक्कांसाठी पेरियार आणि आंबेडकर दोघेही लढत होते. एकमेकांच्या सुधारणावादी चळवळींवर लक्ष ठेवून होते. १९४० नंतर आंबेडकर आणि पेरियार यांच्यामध्ये अनेकदा भेटीगाठी झाल्या. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडल्यानंतर त्याच्या समर्थन करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी पेरियार एक होते. दलित समाजाला धर्मांतर करून बुद्धाच्या शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माच्या मार्गावर आणल्यामुळे त्यांनी आंबेडकरांचा गौरव केला होता.
पेरियार: एक अजरामर विचारसरणी.
पेरियार यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कमालीचे तर्कशुद्ध विचारसरणीचे होते. आपल्या ९४ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अनेक क्रांतिकारी विचार जनतेसमोर मांडले. मात्र त्यातील एक विचार त्यांच्या विस्तृत समाजसुधारणेच्या कार्याला समजण्यास योग्य ठरतो: माझी अशी अपेक्षा नाही कि जगातल्या प्रत्येक माणसाने माझ्या इच्छेप्रमाणे वागावे. परंतु राजकारण आणि सामाजिक जीवन हे समान मानवी हक्क आणि कर्तव्यांवर आधारित असावे, कोणत्याही धर्म आणि पथांवर आधारित नाही, एवढीच माझी इच्छा आहे – पेरियार.