आत्मा तंत्रज्ञानाच्या सगुणा भातलागवड प्रयोगाबरोबरच केली इस्राईल फळबाग लागवड, मुकणे येथील कचरू पाटील शिंदे यांचा शेतीत प्रयोग
मीडियावार्ता
इगतपुरी प्रतिनिधी: भाताचे आगार म्हणून इगतपुरीची ओळख आहे. तालुक्यात खरीप हंगामात अनेक शेतकरी पारंपारिक पद्धतीने भातलागवड करतात मात्र मुकणे येथील प्रयोगशील शेतकरी कचरू पाटील शिंदे यांनी गांडूळ खतांच्या माध्यमातून सगुणा भात लागवडीचा प्रयोग केला आहे. ते ही शेती गेल्या चार वर्षांपासून कमीत कमी खर्चात शेतकऱ्याना फायदेशीर असलेल्या आत्मा योजनेच्या माध्यमातून करीत आहेत. दिवाळीनंतर या शेतीचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, इगतपुरीचे तालुका कृषिअधिकारी रामदास मडके, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे यांच्याकडून वेळोवेळी मिळत आहे. या अगोदर कचरू पाटील शिंदे चारसूत्री भातलागवड पद्धतीचा अवलंब करीत मात्र एसआरटी पद्धत कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पद्धत असून या पद्धतीला लागवड खर्च निम्मा येतो तसेच उत्पादन वाढते, जमीन सुपीक होते तसेच गांडूळाचे प्रमाण वाढते यामुळे ते शेतीकडे वळले आहेत. या शेतीबरोबरच आधुनिक पद्धतीने जनावरांसाठी मुक्त गोठ्याची निर्मिती केली असून चारा व्यवस्थेसाठी सुपर नेपर, बुलेट नेपर, रेड नेपर गवत देखील शेतीत केले आहे. त्यामुळे दुग्धव्यवसायात भरभराट झाली आहे. त्यांनी दोन एकरच्या शेतीत इस्राइल अतिगण पद्धतीने ३४०० रोप फळबाग लागवड करून यावर्षांपासून उत्पादन घेत आहे. शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था, बिना पॉलिश तांदूळ , मूग, गहू, दूध विक्री करतात.
शेतकरी कचरू पाटील शिंदे यांच्याकडे ट्रॅक्टर चलित मिनि राईस मिल असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तांदूळ काढून दिला जातो. शेतकरी बचत गटाची निर्मिती करून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
गेल्या चार वर्षांपासून आत्मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगुणा भातलागवड पद्धतीचा प्रयोग करीत आहे. उत्पादन चांगले मिळते. इस्राईल पद्धतीने फळबाग लागवड देखील केली आहे योग्य पीक पद्धती खते, सेंद्रिय शेतीबाबत कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. कृषी क्षेत्राच्या नवंनवीन संशोधनाच्या माध्यमातून तळागळातील शेतकऱ्याना तंत्रज्ञाचे धडे आत्मसात करण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या मदतीने जनजागृती उपक्रम राबविले जात असून शेतकऱ्याना वेगळे प्रयोग करण्यासाठी उदयुक्त केले जात असून यापुढेही नवीन प्रयोग करणार आहोत – कचरू पाटील शिंदे, प्रयोगशील शेतकरी मुकणे