गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार

19

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार

जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यशाळेमार्फत जनजागृती

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या, विद्यार्थ्यांची शैक्षणिक बुध्दीमत्ता वाढावी, यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात तालुका व बीट स्तरावर ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन जनजागृती केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड बीटातील शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता, अभिरुची, आवडी, दृष्टीकोन आणि शैक्षणिक उपलब्धतता, व्यक्तीमत्व वैशिष्टये याबाबत विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करीत पटसंख्या वाढीसाठी आवाहन केले.

जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. दप्तराविना शाळेपासून खेळता खेळता शिक्षण सारखे उपक्रम राबविले जात आहे. शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पाठिविण्याचे फायदे अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून पटसंख्या वाढीचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा सुरु केल्या आहेत. तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत बीट स्तरावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

अलिबाग तालुक्यातील पोयनाड बीटातील शिक्षकांची कार्यशाळा विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या कार्यशाळेत काचली, पेझारी, सांबरी केंद्रातील 73 हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या 2 हजार 501 शाळा आहेत. 5 हजार 888 शिक्षक असून, 87 हजार 92 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेबाबत विद्यार्थ्यांना आवड निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचा हा नाविन्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.