मुंबई पालिका शौचालयाच्या टाकीत पडून 4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू.

मीरारोड – मीरा भाईंदर महापालिकेने काशिमीरा उड्डाणपुलाच्या खाली चालवलेल्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत बांधलेल्या शौचालयाच्या भूमिगत टाकीस झाकण नसल्याने त्यात पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. अशा घटना नेहमीच घडत असल्याने पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मुंबई :- अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा उड्डाणपुलाच्या खाली महापालिकेने सुशोभिकरणाचे काम चालवले आहे. त्याठिकाणी काशीगाव नाका समोरील पुला खाली सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले असून भूमिगत टाकीच्या चेंबरला झाकण नसल्याने टाकीत पडल्यास बुडून मरण पावण्याचा धोका होता. परंतु पालिका अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवकांनी सदर गंभीर बाबी कडे दुर्लक्ष केले. त्यातच मालाडच्या कोकणीपाडा येथून अफिफा मुस्तफा अन्सारी ही चार वर्षांची मुलगी काशिमीरा येथे नातलगां कडे रहायला आली होती. रविवारी अफिफा ही अन्य लहान मुलांच्या सोबत उड्डाणपुला खाली खेळण्यास आली होती.

खेळता खेळता ती कुठे गेली कळले नाही. तिचा सर्वजण रात्रभर शोध घेत होते. पोलिसांना सुद्धा कळवण्यात आले. रात्रभर शोधून देखील तिचा शोध लागला नसल्याने सोमवारी सकाळी पुन्हा तिचा शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी शौचालयाच्या भूमिगत टाकीत तिचा मृतदेह आढळून आला. टाकीच्या चेंबरला झाकण नसल्याने अफिफा टाकीत पडून आतील पाण्यात बुडून मरण पावल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन
मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अफिफा हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह स्थानिक नगरसेवकांना सुद्धा जबाबदार धरावे अशी मागणी मनसेच्या अनु पाटील, दिनेश कनावजे आदींसह रहिवाश्यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here