मुलाच्या हव्यासापोटी राक्षसी कृत्य, सात वर्षांच्या मुलीचं यकृत बाहेर काढून हत्या

नवी दिल्ली :- देशातील मुलगा आणि मुलगी यातील भेदभाव कमी होण्याचं नाव घेत नाही. आजही अनेक ठिकाणी मुलाच्या प्राप्तीसाठी काही आई-बाप कोणत्याही थराला जात आहेत. स्त्रीभ्रूण हत्या घडत असताना आता पुत्रप्राप्तीसाठी राक्षसी कृत्य करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गुन्हेगारीत आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेशात सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. विषेश म्हणजे या मृत मुलीचे यकृत बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचाही संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी गावातील एका दांपत्याने मुलीच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्यांनी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना एक हजार रुपये दिले होते. आरोपी परशुरामचं 1999 मध्ये लग्न झालं असून मूल नसल्याने त्याला नैराश्य आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पैसे घेतलेल्या दोघांनी शनिवारी रात्री मुलीचं अपहरण केलं. दारुच्या नशेत असणाऱ्या दोघांनीही मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर त्यांनी यकृत बाहेर काढलं आणि विधी करण्यासाठी दांपत्याकडे सोपवलं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी सर्व चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here