लॉकडाऊनच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यात 12 शेतकऱ्यांची आत्महत्या

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूर :- अगोदरच ‘कोरोना’ने कंबरडे मोडले असताना नागपूर जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’च्या कालावधीपासून 12 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. आश्चर्याची बाब म्हणजे आत्महत्येला काही महिने उलटूनदेखील संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारे शासकीय मदत मिळाली नाही. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबीयांच्या वाट्याला प्रशासकीय लेटलतिफीमुळे आता मदतीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली होती. 2001 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत नागपूर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातील किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत मिळाली, ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, 2020 सालात 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील आठ आत्महत्या पहिल्या दोन महिन्यात झाल्या होत्या. मार्च महिन्यात जिल्ह्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला व त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत 12 शेतकऱ्यांनी स्वत:चा जीव दिला. यातील एकाही शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळाली नाही. तर जानेवारी महिन्यात आत्महत्या केलेल्या केवळ दोन कुटुंबीयांना एकूण दोन लाखाची शासकीय मदत प्राप्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here