धम्मचक्र प्रवर्तनाचा क्रांतिकारी प्रवास 

88

धम्मचक्र प्रवर्तनाचा क्रांतिकारी प्रवास 

६३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन देशभरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला धम्म स्वीकारण्या बद्दलची पार्श्वभूमी काय? का गरज पडली?  कुठली कारणे कारणीभूत ठरली? कोण याला जबाबदार? कुणाची काय भूमिका?  त्याचा उगम कुठून झाला? या प्रश्नांची उत्तरे भूतकाळात दडलेली आहेत. त्याकरिता इतिहासात डोकवण्याची गरज आहे सुरवात करतो म्हटले कि गौतम बुद्धाच्या कालखंडापासून करावी लागेल.

गौतमबुद्ध (इ.स.पु.५६३ – इ.स.पु. ४८३):- गौतमबुद्ध भारतीय तत्वद्य बौद्ध धर्माचे संस्थापक, शाक्य गणराज्याचा राजा, बुद्ध हे नाव नाही उपाधी आहे बुद्ध शब्दाचा अर्थ  “आकाशा एवढा प्रचंड विद्वान स्वतःवर विजय मिळविलेला स्वतः सोबत संपूर्ण जगाचा उद्धार,उत्कर्ष,विकास,संपन्न करू शकणारा जगाच्या सार्वकालीन इतिहासातील महामानवामध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात आज सर्व खंडामध्ये बुद्धाचे अनुयायी आहेत आशिया खंडात बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे.आशिया खंडात जवळपास ४९ टक्के जनसंख्या बौद्ध धर्मीय आहे.

क्रवती सम्राट अशोक (इ.स.पु. ३०४ – इ.स.पु. २३२) :- सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान सम्राट होते त्यांनी अखंड भारतावर इ.स.पु. २७२ ते इ.स.पु. २३२ दरम्यान राज्य केले त्यांनी ४० वर्षाच्या विस्तुत राज्यकाळात त्यांनी पश्चिमे कडील अफगाणिस्थान, थोडा इराण पूर्वेकडे आसाम दक्षिणेकडे मैसूर पर्यंत आजचा पाकिस्तान,बांगलादेश, नेपाळ,भूतान, ताजिकिस्तान,तुर्कमेनिस्तान या देशामध्ये सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या ते एकही युद्ध हरले नाहीत.कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्धधर्माचा स्वीकार केला नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारात समर्पित केले सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात पसरविला होता सम्राट अशोक सत्य,अहिंसा, प्रेम, सहिष्णुता यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली.

शोका विजयादशमी (इ.स.पु.२६५) :- सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धाच्या विजयाच्या दहाव्या दिवशी विजयउत्सव मनविण्यात आला म्हणून अशोक विजयादशमी असे म्हणतात. हा आनंदउत्सव दहा दिवस पर्यंत चालला दहाव्या दिवशी राजपरिवारासोबत पूज्य भन्ते मोग्गीलीपुत्त तिष्या कडून धम्म दीक्षा ग्रहण केली प्रति__ केली कि आता शस्त्राने नाही तर शांती आणि अहिंसा द्वारे लोकांचे मने जिंकून हृदयावर राज्य करीन म्हणून संपूर्ण बौद्ध देश अशोक विजयादशमी साजरी करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसें १९५६) :- बाबासाहेबांचा जन्म अस्पृश्य समाजात झाल्यामुळे बालपणापासूनच त्यांना अन्याय, अत्याचार,भेदाभेद यांचा सामना करावा लागला त्यामुळेच ते बालपणापासून ते मनाने खंबीर होत गेले आणि जिद्दीने शिकून सर्वांना प्रतिउत्तर दिले सर्वोच शिक्षण घेऊन सुद्दा त्यांना अपमानक वागणूक मिळतच गेली म्हणून मनुस्मृतीवर आधारित वर्ण व जाती व्यवस्थेचा अभ्यास केला व त्यांच्या लक्षात आले कि हा ग्रंथच या समस्येचे मूळ आहे. मनुस्मृतीने कनिष्ठ जातीवर अनेक अपात्रता लादल्या उच्चं जातींना विशेष अधिकार दिले मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यावर होणाऱ्या अन्यायाचे,क्रूरतेचे विषमतेचे प्रतीक आहे म्हणून २५ डिसेंबर १९२७ जाहीरपणे दहन केले.

संपूर्ण देशात अस्पृस्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा पिण्याचा स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. १९२६ साली बाबासाहेब मुंबई प्रांतिक विधानसभेचे नेमलेले सदस्य बनले १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेच्या विरुद्व जनजागृति चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढणे सुरु केले.४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी.के.बेले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला होता सार्वजनिक निधीतून व शासकीय नियमानुसार सार्वजनिक बांधलेल्या शाळा,न्यायालये,कार्यालये, दवाखाने सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे,विहिरी, धर्मशाळांचा वापर करण्याची परवानगी परिषदेने अस्पृश्य वर्गाला दिली या ठरावानुसार महाड नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांकरिता खुले करण्याचे जाहीर केले परंतु स्पृस्यांने अस्पृस्यांना पाणी वापरू दिले नाही त्यामुळे अस्पृस्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरिता बाबासाहेबांनी पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह करण्याचे ठरविले आणि २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचे पाणी ओंजळीने सर्वप्रथम पिऊन हक्क मिळविला.अस्पृस्यांना मंदिरात प्रवेश वर्जित होता २६ जून १९२७ रोजी अमरावती येथील प्रसिद्ध अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात लढा सुरु केला. समानतेचा अधिकार मिळविण्याकरिता मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता अस्पृस्यांच्या मंदिर प्रवेशाने मंदिर, मंदिरातील मूर्ती अपवित्र होत नाही हा या चळवळी मागील मुख्य उद्देश होता नंतर पुण्यातील पर्वती टेकडी मंदिर नासिक येथील काळाराम मंदिर हा या चळवळीचा भाग होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित, शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्हींही गोलमेज परिषदांचा हजर राहिले.दि. १२ नोव्हेंबर १९३० रोजी पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. या परिषेदला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री. रावबहादूर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते जागतिक पातळीवर त्यांनी अस्पृस्यांच्या समस्या मांडल्या सन १९३०, १९३१ व १९३२ या वर्षी गोलमेज परिषदा झाल्या, त्यात बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या भयानक जीवनाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले, की कशाप्रकारे दीन दलितांवर सर्वण हिंदू अत्याचार करतात. कसा हा समाज हजारों वर्षापासून सर्वणांच्या गुलामगिरीत जगत आहे. या ७ कोटी समाजाला सामाजिक, राजकिय, धार्मिक, संस्कृतिक समता मिळावी म्हणून बाबासाहेब लढले. शोषित, पीडित व दलिताच्या उत्थानासाठी त्यांनी राजकिय स्वातंत्र्य आवश्यक आहे याचा त्यांनी पुरस्कार केला तसेच इंग्रजांनी भारत सोडावा असा इशारा त्यांनी ब्रिटीशांना त्यांच्याच भूमित दिला. बाबासाहेबांचे राष्ट्रवादी व क्रांतिकारी विचार ऐकून इंग्रज पत्रकारांना प्रश्न पडला की, “डॉ. आंबेडकर हे स्वातंत्र्य सेनानी आहेत की क्रांतिकारक ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. परंतु जुन्या रूढी परंपरा उपडून फेकणे त्याकरिता सनातन्यांचा विरोध करताना हिंदू धर्मात सुधारणा करण्यापेक्षा शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करून बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू लागले, त्यांची मने चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या हिंदू धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा कुठला? जेथे परत जातवादाची पुनरावृत्ती होईल अशा दुसऱ्या धर्मात अजिबात जायचे नव्हते.

१३ ऑक्टोबरइ.स. १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष अमृत धोंडिबा रणखांबे होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरू झाले. बाबासाहेब म्हणाले “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा लढा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?” बाबासाहेबांच्या या विधनांवर सभेतील लोकांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. बाबासाहेब पुढे म्हणाले मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले. ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळली. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहचला.

र्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा :- बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करून दुसर्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हां हां म्हणता सातासमुद्रापार गेली. आणि नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टांनी उभे जग पालथे घालत असणार्या अनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशांतून अक्षरश: पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता.

शीख धर्माची चाचपणी १३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोपर्यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबांनीही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट इथे हजेरी लावली. सेवानिवृत्त न्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर उपस्थित होते या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले..भाषणात ते म्हणाले हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामाचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव लादले, अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेची तत्त्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगतिप्रवर्तक आहेत. त्यामुळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे.शीख धर्माकडील त्यांचा विशेष झुकाव होता. पण जो कुठला धर्म स्वीकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करून, मानवी मूल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंकाकुशंकांचे निराकरण झाल्यानंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतण्या मुकंद याना बाबासाहेबानी, अमृतसर येथील गुरुद्वारात वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारातील शीख बांधवांनी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुले परत आली.

१८ सप्टेंबर १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसरला गेले. मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. ही तुकडी अमृतसरला पोहचून तिने शीख धर्माचा अभ्यास सुरू केला. दरम्यान काळात झालेल्या पत्रव्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारी अनेक पत्रे बाबासाहेबांना मिळाली. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रांत बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. इकडे बाबासाहेब इतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दीक्षाच घेऊन टाकली. खरेतर बाबासाहेबांनी त्यांना अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्वीकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय इतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकले गेले. पुढे शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबांना शीख धर्म स्वीकारण्याचा विचार सोडून द्यावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची जबाबदारी अंगावर पडली.

ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधीपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरित होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले. ख्रिश्चन मिशनर्यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचीही कल्पना दिली.

मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन :- मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबांना तार केली, त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू बाबासाहेबांना भेटण्यास आले. बाबासाहेबानी इस्लाम स्वीकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडून कशी पैशाच्या सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यांनी इस्लाम स्वीकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास हिंदूंचा कसा थरकाप उडेल हे सुद्धा बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मुक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरुष यांचा वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिक पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडझेप घ्यावयाची होती. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला.

बौद्ध धम्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहांनी बाबासाहेबांना तार केली. “भारतात जन्मलेल्या, जातिभेद न मानणार्या, सर्वाना समान समजणार्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हां सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक कानाकोपर्यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती, अनुयायी व धम्मबांधव आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून आणेल. तळागाळातल्या लोकांच्या प्रती अत्यंत करुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हां सर्वांचा इतिहास रचेल” अशा प्रकारचा एकंदरीत संदेश बाबासाहेबांना मिळाला.

बुद्धिप्रमाण्यवादी बाबासाहेबांनी घाई न करता आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग २१ वर्षे जगातील विविध धर्मांचे अध्ययन केले. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी म्हणून पूर्णपणे बौद्ध धम्माकडे वळला. म्हणूनच धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ स्थापन केले.तसेच औरंगाबाद या ठिकाणी इ.स. १९५० महाविद्यालयात काढून त्यास मिलिंद महाविद्यालय व परिसरास नागसेनवन असे नाव दिले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाला ‘राजगृह’असे नाव दिले.त्यांनी ‘दिनांक १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर’ हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला.

नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यांनंतर स्वत: आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा नागपूरमध्ये त्यांनी आदल्या दिवशी येऊ न शकलेल्या २,००,००० अनुयायांना दीक्षा दिली. त्यानंतर १६ ऑक्टोबरला धम्मदीक्षेसाठी चंद्रपूरला गेले, आणि तेथेही तिसऱ्यांदा त्यांनी ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. अशाप्रकारे केवळ तीन दिवसांत आंबेडकरांनी १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते कारण ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.

धर्मांतरामुळे आणि भारतीय संविधानामुळे अस्पृश्यांचे प्रश्न सुटले पण बाबासाहेबांचे संपूर्ण भारत बौद्धमय करिन हे स्वप्न त्यांच्या लवकर झालेल्या महानिर्वाणामुळे अपूर्ण राहिले. आज बुद्धाच्या समतावादी विचाराची गरज देशालाच नाही तर जगाला आहे अलीकडेच पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असे म्हणाले भारताने जगाला समता-शांतीचा बुद्ध दिला पण प्रश्न कायम आहे बुद्धाच्या शिकवणीनुसार खरेच का देशातील दिनदलितांना माणुसकीची वागणूक मिळते? आजही सनातनी बहुसंख्यांक हिंदू समाजाच्या दृष्टीतून जातीयता-अस्पृश्यता पाळणे धर्मश्रद्धेचाच भाग आहे खेडोपाडी आज हि अस्पृश्यता पाळली जाते,दलितांच्या प्रेमविवाह केला तर जीवे मारले जाते आजही द्वेष पसरविल्या जात आहे भारतीय माध्यमांचाही मोठा वाटा आहे बुद्धाच्या मानवतावादी विद्याननिष्ठ शिकवणुकीला आपले हे सामाजिक वर्तन विसंगत नाही काय? विषमतेने समाज आजही दुभंगला आहे नैतिकता नीतिमत्ता पणाला लागली आहे म्हणून बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी विचारांचे स्मरण करणे, विचार प्रसारित करणे, विचार अंगीकारणे, विचार प्रस्थापिक करणे,हेच अंतिमतः समाज-देशहिताचे ठरेल धम्मचक्र प्रवर्तनाचा हाच खरा संदेश ठरावा

राजकुमार वरघट
नागपूर
मोबाईल नं. ९९७०१९५३२५/८६६९०२७०२१