गॅस वेल्डिंगच्या दुकानात कॅल्शियम कार्बोक्साईडच्या डब्याचा स्फोट, एक गंभीर जखमी.

✒️क्रिष्णा वैद्य ✒️
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :- शहरातील गुजरी वार्ड येथे अत्यंत वर्दळीच्या असलेल्या भाजीपाला बाजारात गुलाब गॅस वेल्डिंगमध्ये कॅल्शियम कार्बोक्साईडच्या डब्याचा स्फोट झाला. या स्फोटात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण शहरात या स्फोटाचा आवाज नागरिकांना ऐकू आला.
गुजरी वार्ड येथे गुलाब गॅस वेल्डिंगचे दुकान अनेक वर्षापासून सुरू आहे. मालक गुलाब राखडे वय 63 हे आज, मंगळवारी दुकानात काम करीत असताना अचानक कॅल्शियम कार्बोक्साईडच्या लोखंडी डब्याचा स्फोट झाला. स्फोटात गुलाब राखडे यांच्या पायाला, पाठीला व पोटाला गंभीर दुखापत झाली. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यांच्या घरातील गेट व खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच संपूर्ण परिसर हादरला. “जखमीला स्थानिक ख्रिस्तानंद रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.