महाकाली मंदिर विकासकामाच्या निविदेला मंजूरी दिल्याबद्दल आ. किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत मानले आभार पुरातत्व विभागाची मंजुरी लवकर मिळवून देण्याची केली मागणी

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

चंद्रपूर, १७नोव्हेंबर: माता महाकाली मंदिराच्या ६० कोटी रुपयांच्या विकासकामाच्या निविदेला प्रशासकीय मान्यता दिल्या बद्दल आ. किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांचे आभार मानले असून आता लवकरात लवकर पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगर विकासमंत्री असताना त्यांनी महाकाली मंदिराच्या विकासकामासाठी सदर ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी आ. जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यासाठी त्यांच्या वतीने शासन स्तरावर पाठपुरावा केल्या जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी पुरातत्व विभागाने एकत्रित मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पहिल्या टप्यातील ६० कोटी रुपयांच्या विकासकामाच्या निविदेला शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी सदर कामासाठी अद्यापही पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त झालेली नाही.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आ. जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत सदर विकासकामाच्या निविदेला प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिल्याबदल त्यांचे आभार मानले आहे. तर नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली असून त्यांचेही आ. जोरगेवार यांनी आभार मानले. सोबतच या कामात येत असलेली पुरातत्व विभागाची अट रद्द करून पुरातत्व विभागाकडूनही या विकासकामाला मान्यता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. यावेळी या विकासकामात येत असलेल्या सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आ. जोरगेवार यांना दिले. महाकाली मंदिराच्या दुसऱ्या टप्याच्या विकासकामासाठी ७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आ. जोरगेवार यांनी पाठविला आहे. तर यात्रा पटांगणच्या विकासासाठी तिसऱ्या टप्यातही निधी उपलब्ध व्हावा अशी आग्रही मागणी आ. जोरगेवार यांनी केली. दुसऱ्या टप्यातील ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. ही विकासकामे होणार असतांना मंदिराच्या मुळ रचनेत कोणताही बदल केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतांनाही या कामात पूरातत्व विभाग अडचण निर्माण करत असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले असुन केंद्र सरकारने याकडे लक्ष देत पुरातत्व विभागाची मंजुरी प्राप्त करून द्यावी याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुद्धा यापूर्वी भेट घेतली. सोबतच केंद्रातील संबंधित मंत्र्यांकडेही आ.जोरगेवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here