राजकारणातली मक्तेदारी: पैशांशिवाय निवडणुक नाही म्हणत राजकारणात घुसवली घराणेशाही

90

राजकारणातली मक्तेदारी: पैशांशिवाय निवडणुक
नाही म्हणत राजकारणात घुसवली घराणेशाही

सुशिक्षित, प्रामाणिक, होतकरु तरुणांना संधी देण्याची गरज

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
7715918136

पनवेल : राजकारण म्हटले की पैसा आणि पैशांशिवाय राजकारण नाही. अशी सामान्य राजकीय कार्यकर्त्यांत मानसिकता पसरवुन पिढ्यानपिढ्या आपल्या नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानणारे सर्वच पक्षातील एकनिष्ठ, सुशिक्षित, प्रामाणिक व होतकरु कार्यकर्ते नेत्यांच्या अनास्थेमुळे संपत चालले आहेत. त्याचप्रमाणे राजकारणात घराणेशाही घुसवून सर्व लाभार्थी पदे आपल्याच घरात कशी घेता येतील. तशी तजवीज करून आपले सुप्त मनसुबे प्रत्यक्ष साकारणारे बडे राजकीय नेते आहेत. आतातरी ही राजकीय मानसिकता बदलुन समाजात लोकहितासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणूकीत तिकीट देऊन सदर कार्यकर्त्यांंना निवडुन आणा . अशा अपेक्षा कार्यकर्त्यांकडुन व्यक्त केल्या जात आहेत.
नविन होतकरु, सुशिक्षित, प्रामाणिक , लढाऊ, झुंजार चेहरे राजकारणात येऊच नये. इथे पिढ्यानपिढ्या आपली घराणेशाहीच राहिली पाहिजे. यासाठी राजकारणी मंडळी पैशाशिवाय निवडणूक नाहीच जिंकु शकत, असे नरेटिव्ह पसरविण्यात यशस्वी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. कोणतीही निवडणूक म्हटले की पैसा लागतोच , हे इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेच्या मनात अगदी ठामपणे बिंबवले आहे. येथील राजकीय नेते मंडळी पैश्यातुन सत्ता आणि सत्तेतुन पैसा मिळवून अगदी पिढ्यानपिढ्या जनतेची पिळवणूक करत ऐशो आरामात गाड्या, बंगले बांधून जिवनाचा आनंद घेत आहेत. आपल्या सतराशे साठ पिढ्या आरामात बसून खातील ए्वढी संपत्ती गैरमार्गाने कमवतात.

कार्यकर्ते मंडळी नेत्याने दिलेल्या भाडोत्री फाॅरच्युनर गाडीत प्रचार करत फिरतात. अन त्या नेत्याचा आणि त्याच्या फाॅरच्युनर गाडीचा फोटो स्टेटस वर ठेवून त्याच्या साहेबाला मिरवतात. साहेबाचे गुणगान गात फिरतात. अशा प्रकारे निवडणुकीत हीच नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी लावून फिरवतात. त्याचप्रमाणे सामान्य कार्यकर्ते मात्र साहेबांनी, सुख – दु:खात घरी भेट दिली , एखाद्या पार्टीला बोलावलं की खुष ! त्याचे गुणगान दिवसाचे तिन्ही प्रहर गात बसणार आणि यांच्या प्रसिध्दीला मोठा हातभार लावणार. हेच नेते पक्षाच्या बैठकीत सांगणार की आता कोणतीच निवडणूक सोपी नाही राहिली. महापालिकेच्या निवडणुकीत वीस पंचवीस लाख आणि विधानसभेसाठी दिड दोन कोटी लागतात. झालं इथंच सगळं संपलं . हाच प्रचार मग नेत्यांची पिल्लावळ मतदार संघात गप्पा मध्ये करत राहते. याचा परिणाम असा होतो की, चांगले होतकरु कार्यकर्ते राजकारणापासून दुरच राहतात. यात नेमकी मेख ही आहे की, ज्या वेळी सामान्य माणूस अडचणीत असतो तेव्हा ही मंडळी गायब असतात. पैशे देऊन निवडणूक जिंकलेले हे लोक मदत मागायला गेलेल्या कार्यकर्त्यांला बोलुन दाखवतात की तु काय आम्हाला फुकट मत दिले का ? त्या बदल्यात तुला आम्ही पैशे दिलेत. मग पुन्हा संपलं सगळं !

आता ज्या लोकांना आपण वारंवार निवडुन देतो ते लोक किती वेळा शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरले ? आंदोलन केले ? हा संशोधनाचा भाग आहे. आता नुकतीच पावसाळ्यात ओढवलेली परिस्थिती पहा . अतिवृष्टी झाली, महापुर आले, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पण एका तरी नेत्याने शेतकऱ्यांसाठी आंदोलन, उपोषण केले का ? हा विचार नविन पिढीने केलाच पाहिजे. जो पर्यंत मतदार पैसे घेऊन विकला जाणार तोपर्यंत याच नेते लोकांचं चांगभलं होणार. मागच्या वेळेस निवडुन आलेल्या काहींनी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळीही सर्वसामान्यांसाठी काम करण्याची इच्छा असलेले उच्चशिक्षित, होतकरू, तरुण, प्रामाणिक कार्यकर्ते समाजाचं भलं करण्यासाठी पुढे आणणे काळाची गरज झाली आहे.

प्रचंड विकास करणार म्हणून मते मागणार आणि निवडणूक झाली की गायब होणार. कुठे भेट झाली अन् विकास कामांची विचारणा केली तर समयसूचकता दाखवत वेळ मारुन नेणार. मग प्रत्यक्ष यांचा विकास फक्त कागदावर जन्म घेणार. नेते मंडळी स्वतः चा हेतु साध्य करुन घेतात. निवडणुकीनंतर सामाजिक संकट काळात ह्या लोकांच्या नावाने सोशल मीडियात शिमगा करण्यापेक्षा निवडणूक हीच खरी वेळ असते. समाजासाठी ख-या अर्थाने लढणारे होतकरू तरुण तडफदार कार्यकर्ते मैदानात उतरवले पाहिजे. त्यांना बळ दिलं गेलं तरच न्याय मिळवता येईल. जनतेने कोणताही पक्ष , पार्टी न पाहता पैशाशिवाय कोणतीच निवडणूक लढणे शक्य नाही. असे नरेटिव्ह पसरवून पैशावर निवडणूका जिंकता येतात हे मिशन हाणुन पाडत धनदांडगे नेते मंडळींना आता घरी बसवणे काळाची गरज बनलेली आहे.