श्रीवर्धन नगर पालिका निवडणूक 2025 : उमेदवारी अर्जांच्या जल्लोषात सर्व पक्षांचे शक्तीप्रदर्शन

211

श्रीवर्धन नगर पालिका निवडणूक 2025 : उमेदवारी अर्जांच्या जल्लोषात सर्व पक्षांचे शक्तीप्रदर्शन

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

श्रीवर्धन │ नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने शहरात दिवसभर राजकीय तापमान चांगलेच चढले होते. सर्व प्रमुख पक्षांनी मोठ्या रॅली, ढोल-ताशे आणि समर्थकांच्या गर्दीत आपापले उमेदवार अर्ज भरून घेत शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांत प्रत्येकी दोन अशा एकूण २० जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)–भाजपा युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट नगराध्यक्ष पदासाठी श्री. जितेंद्र सातनाक यांचा अर्ज दाखल केला. युतीचे स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळ लक्षवेधी ठरले.

दुसरीकडे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी एकला चलो रेची भूमिका घेत सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले असून नगराध्यक्ष पदासाठी सौ. अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर यांनी उमेदवारी दाखल केली. स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेस यांच्या आघाडीने १४ जागांवर उमेदवारी निश्चित केली असून नगराध्यक्ष पदासाठी श्री. अतुल चौगुले यांचा अर्ज दाखल झाला आहे. आघाडीचा प्रचार मोडही आजपासून गती घेतल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या जोशात अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, अपक्ष म्हणून पत्रकार श्री. अमित रामचंद्र घोडमोडे यांनीही थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रंगतदार केली आहे.

आजच्या शक्तीप्रदर्शनाने सर्वच पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीवर्धनच्या मतदारराजाचे अंतिम मनधरणे कोण करणार? राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे विद्यमान वर्चस्व टिकणार की अन्य कोणता पक्ष बाजी मारणार? याचे स्पष्ट चित्र आता निवडणूक निकालाच्याच दिवशी दिसणार आहे.