लग्नघरी न्हानोऱ्यादरम्यान युवतीच्या अंगावर फेकले उकळते पाणी, 40 टक्के भाजली
अमरावती:- नव्या नवरीसोबत तिची बहीण किंवा मैत्रीण येत असेल तर नवरदेवाकडील समवयीनांकडून थट्टामस्करी करणे ही आम बात झाली आहे. परंतु अशी थट्टामस्करी दोघा पाहुण्यांच्या अंगलट आल्याची घटना येथे घडली.
गरम पाणी फेकल्यामुळे नवरीसोबत वराकडे आलेली युवती गंभीररीत्या भाजल्या गेली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी प्रतीक राजेंद्र देशमुख वय 26 व संकेत राजेंद्र देशमुख वय 30, दोघेही रा. सोनल कॉलनी, अमरावती यांच्यासह अन्य एक, अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात प्रतीक आणि संकेत या दोघांना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.
संबंधित युवती ही त्या घटनेत 40 टक्के भाजल्या गेल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवड्यापूर्वी या घटनेतील जखमी युवतीच्या चुलत बहिणीचे लग्न झाले. त्याच दिवशी ती नवरीसोबत अमरावतीत आली. दुसऱ्या दिवशी पारंपरिक नान्होरा होता. त्यात थट्टामस्करी सुरू होती. प्रतीक आणि संकेतसह अन्य एकाने आंघोळीसाठी तयार केलेले गरम पाणी युवतीच्या अंगावर फेकले.
पाण्याचे तापमान अधिक असल्याने गरम पाणी शरीरावर पडताच ती पळू लागली. परंतु तोपर्यंत बराच वेळ झाला होता. युवती भाजल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रतीक व संकेतसह अन्य एकाला पाणी गरम असल्याची माहिती असतानाही त्यांनी ते आपल्या अंगावर फेकल्यामुळे वेदना झाल्याने आपण जळाल्याचे युवतीने पोलिसांना दिलेल्या बयाणात म्हटले असल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले.