पहिल्या नवऱ्याशी चॅटिंग करते म्हणून पतीने केला पत्नीचा खून
नवी मुंबई:- बेकायदेशीररित्या राहणाऱ्या एका 26 वर्षीय बांगलादेशी तरुणीचा तिच्या दुसऱ्या पतीने गळा घोटून खून केल्याचे समोर आले आहे. खूनानंतर तब्बल तीन आठवड्यांनी ही घटना उघडकीस आली असून तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा दुसरा नवरा मोहम्मद शेख याला अटक केली आहे.
लीपी सागर शेख ही बांगलादेशी तरुणी आणखी दोन बांगलादेशी महिलांसोबत कळंबोली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. लिपी हिने पहिलं लग्न मोडल्यानंतर दुसरं लग्न मोहम्मद सोबत केलं होतं. मात्र त्या दोघांचेही पटत नसल्याने लिपी त्याला सोडून कळंबोली येथे राहत होती.
लॉकडाऊनमध्ये लिपी व तिच्या रुममेट्सचे जॉब गेले. त्यानंतर लिपी सोबत राहणाऱ्या दोन महिला बांगलादेशला परतल्या मात्र लिपीने इथेच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मोहम्मदला लिपी पुन्हा एकदा तिच्या पहिल्या पतीशी चॅटींग करत असल्याचे समजले. त्यावरून त्याचे व लिपीचे खटके उडत होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अशाच एका भांडणानंतर मोहम्मद लिपीच्या घरी आला व त्याने रागाच्या भरात तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो घर लॉक करून तेथून निघून गेला.
या दरम्यान लिपीसोबत राहणाऱ्या दोन्ही महिला पुन्हा हिंदुस्थानात परतल्या. त्या कळंबोली येथील घरी आल्या असता घराला कुलुप लावलेले होते. त्यांनी लिपीला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा फोन बंद येत होता. त्यांनी घरमालकाकडून दुसरी चावी मागितली मात्र त्याच्याकडे चावी नव्हती. अखेर त्यांच्या प्रॉपर्टी एजंटकडे घराची ड्युप्लिकेट किल्ली होती. त्यांनी त्याने दरवाजा उघडला त्यावेळी त्यांना घरात लिपीचा कुजलेला मृतदेह सापडला. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना कळवले.
लिपीची हत्या केल्यानंतर मोहम्मद बांगलादेशला परतला होता. त्यामुळे त्याला अटक करणे नवी मुंबई पोलिसांसमोर आव्हानच होते. मोहम्मदसोबत काम करणाऱ्या कारागिरांना हाताशी घेत पोलिसांनी त्याच्यासाठी सापळा रचला. त्या कारागिरांनी मोहम्मदला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले. जास्त पैशाच्या आमिषापोटी तो बांगलादेशवरून परतला. तो मुंब्रा येथे त्याच्या घरी येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणी सय्यदवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सय्यदसहित लिपीसोबत राहणाऱ्या दोन महिलांविरोधात बेकायदेशीर रित्या हिंदुस्थानात वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.