*”त्या” महिला वाहतूक पोलिसाचा ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांकडे सादर*

*पिंपरी* – येथील शगुन चौकात एका महिला वाहतूक पोलिसाने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ शहरात व्हायरल होऊन चर्चेचा विषय बनला. त्याबाबत वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात आहे. सहाय्यक आयुक्तांनी याबाबत कसुरी अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. यावर वरिष्ठ लवकरच निर्णय घेतील.

पिंपरी वाहतूक विभागात कार्यरत असलेली एका महिला वाहतूक पोलीस शगुन चौकात अन्य सहका-यांसोबत कर्तव्य बजावत होती.

दरम्यान तिथे एका मोपेड दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित महिला वाहतूक पोलिसाने त्यांना सांगितले.

ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तडजोड झाली. आणि त्या वाहतूक पोलीस महिलेने अनोख्या पद्धतीने ती रक्कम स्वीकारली. एका तरुणीने चक्क वाहतूक पोलीस महिलेच्या पॅन्टच्या मागच्या खिशात पैसे ठेवले आणि पोलीस महिलेने ते स्वीकारले असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांपर्यंत हा व्हिडीओ जाऊन पोहोचला आणि नंतर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली.

आम्ही वरिष्ठांकडे रिपोर्ट पाठवला आहे. त्यावर काय कारवाई होईल, हे वरिष्ठच ठरवतील, असे पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी सांगितले.

*वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, “आम्ही संबंधित पोलीस कर्मचारी महिलेचा कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. तसेच संबंधित महिला पोलीस कर्मचा-याच्या अन्य सहकारी वाहतूक पोलिसांची देखील या प्रकरणातील भूमिका तपासली जात आहे. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल.”*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here