रेवस -करंजा जलमार्गावर दोन प्रकल्प कशाला?
रोरो सेवेसाठीचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रेवस – करंजा दरम्यान खाडीपूल उभारण्यात येत आहे.तसेच या मार्गावर सागरी रो रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र रेवस – करंजा खाडी पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाल्यानंतर रेवस-करंजा या जलमार्गावरील रोरो सेवा चालणार आहे का? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. या कामासाठी करण्यात येणारा सुमारे ४५ कोटी चा खर्च पाण्यात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच वेळी एकाच सोयीसाठी दोन प्रकल्पावर खर्च कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
रेवस-करंजा खाडीवर पूल उभारण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण तालुक्यातील करंजा दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी २ हजार ९६३ कोटी रुपयांचा ठेका ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला असून कंपनी पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण करणार आहे. दरम्यान खाडी पूल उभारण्यास झालेल्या विलंबामुळे ४४ वर्षात खाडी पुलाचा खर्च २ हजार ६६३ कोटींनी वाढला आहे.
अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या खाडी पुलाची चर्चा १९७० पासूनच सुरू झाली होती त्यानंतर १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. काही कामे सुरू झाली होती. परंतु बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर १९८२ मध्ये लगेचच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यानंतर रेवस करंजा खाडी पूल हे स्वप्नच राहिले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेवस रेडी सागरी महामार्ग दृष्टिक्षेपात येणार आहे. रेवस -करंजा हा पूल दोन किमी लांबीचा असून चार लेन उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोस्ट ते अलिबाग दरम्यानचे अंतर २५किलोमीटरने कमी होणार आहे. या पुलावरून तब्बल ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावतील असे डिझाईन विकसित करण्यात येत आहे. पूलावर दोन्ही बाजूला १.५ मीटर रुंद पादचारी पदपथ समाविष्ट करण्यात आले आहेत. पूलाला जोडण्यासाठी ५.१३ किलोमीटर लांबीचा तर रेवस येथे १.७१ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.
*रो – रो सेवेची कामे रखडली*
रेवस करंजा दरम्यान रोरोसेवा सुरू करण्यात येणार आहे.यासाठी करंजा व रेवस येथे रोरो अनुषंगाने २०१८ पासून कामे हाती घेण्यात आली आहेत. करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. मात्र ही कामे रखडल्याने कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र रेवस बंदरावरील कामे रखडली आहेत. रेवस जेट्टी येथील कामाचा खर्च २५कोटी वरून ३० कोटी वर पोहोचला आहे.
*रो रो सेवा चालणार?* रेवस करंजा पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवस करंजा दरम्यान अंतर वाहनाने दहा मिनिटाच्या आत पार करणे शक्य होणार आहे. तर या मार्गावरील रोरो जहाजात वाहने पार्क करणे, त्यानंतर जलमार्गे प्रवास पूर्ण केल्यानंतर जहाजातून वाहन बाहेर काढणे यात वेळ जाणार आहे.यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रो रो सेवेला प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.