मिडीया वार्ता न्यूज

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांत गुंडाळल्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी २८७ धावांची गरज होती. सुपर स्पोर्ट्स पार्कची खेळपट्टी केपटाऊनप्रमाणे तेज नसल्यामुळे आणि विराट कोहलीच्या पहिल्या डावातील १५३ धावांच्या खेळीच्या पार्श्वभूमीवर विजयाचे लक्ष्य भारताच्या आवाक्याबाहेर नव्हते. पण चौथ्या दिवसअखेर मुरली विजय, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे तीन फलंदाज बाद करून दक्षिण आफ्रिकेने भारताच्या सामना जिंकण्याच्या आशांना काहीसा सुरुंग लावायला सुरुवात केली. पाचव्या दिवशी उर्वरित भरवशाचे फलंदाज चांगली कामगिरी करून चमत्कार घडवतील, अशी अंधुक आशा काही हितचिंतक बाळगून होते. आधीचा सामना आणि डावातील चुकांपासून कोणताही बोध न घेता सात फलंदाजांनी अक्षरश: हाराकिरी करत आपल्या विकेट्स दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना बहाल केल्या आणि स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. अखेरच्या दिवसातला पहिला बाद होणारा खेळाडू चेतेश्वर पुजारा होता. तिसरी धाव घेण्याची घाई त्याला नडली आणि तो १९ धावांवर धावचित झाला. पहिल्या डावात आपल्या पहिल्याच चेंंडूवरही तो धावचित झाला होता. दोन्ही डावांत धावचित होणारा चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय कसोटीपटू ठरला. डावखुºया पार्थिव पटेलने शानदार चौकार वसूल केले तेव्हा तो भारताची धावसंख्या वाढवणार असे वाटत असतानाच त्याने कॅगिसो रबाडाचा आखूड टप्प्याचा चेंडू हूक करण्याचा प्रयत्न केला आणि फाईन लेगवरील मॉर्न मॉर्केलने त्याचा झेपावत एक हाती झेल घेतला. पटेलने १९ धावा केल्या. पहिल्या कसोटीत ९३ धावा केल्यामुळे अनेकांनी हार्दिक पंड्याची तुलना माजी अष्टपैलू खेळाडू कपिलदेवशी केली. बुधवारी त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. रोहित शर्मासह त्याने भारताच्या धावसंख्येत वाढ केली असती, पण ट्वेण्टी-२० क्रिकेटला साजेशा खेळ करत त्याने लुंगी एनगिडीचा बाहेर पडलेला चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षक क्विंटन डे कॉकने उजवा हात हवेत उंचावत एकहाती झेल पकडला. पंड्या केवळ सहा धावाच करू शकला. पुढच्याच षटकात एनगिडीचा बाहेर जाणारा चेंंडू ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात अश्विनने (३) क्विंटन डे कॉककडे झेल दिला आणि भारताची स्थिती ७ बाद ८७ अशी झाली. भारतीय संघ शतक गाठेल का? अशी शंका उपस्थित झाली असताना रोहित शर्मा आणि महम्मद शमीने आक्रमक पवित्रा घेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे चेंडू सीमारेषेपार टोलवले. या दोघांनी ६१ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी करत संघाला दीडशे धावांच्या समीप नेले. अखेर ही जोडी फोडण्यात रबाडाला यश आले. रोहित शर्माने पूल केलेला चेंडू एबी डिविलीयर्सने पुढे झेपावत टिपला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. रोहित शर्माने ७४ चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने ४७ धावा केल्या. पुढील दहा धावांत महम्मद शमी २८ धावा आणि जसप्रीत बुमराह दोन धावा करून बाद झाले आणि भारताचा डाव ५०.२ षटकांत १५१ धावांवर आटोपला. लुंगी एनगिडीने ३९ धावांत सहा, तर कॅगिसो रबाडाने ४७ धावांत ३ बळी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here