मुंबईत नायलॉनच्या मांजाने कापला सहायक पोलीस निरीक्षकाचा गळा.

नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली असतानाही पतंग उडवण्यासाठी त्याचा सर्रास वापर सुरू असून या धाग्यामुळे एका सहायक पोलीस निरीक्षकाला गंभीर दुर्घटनेचा सामना करावा लागला.

दयानंद सावंत

मुंबई :- सरकारी बंदीनंतरही नायलॉन मांजाची विक्री राज्यात सुरुच आहे. या जीवघेण्या मांजामुळे दुर्घटना घडल्याच्या घटना नाशिक आणि नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी उघड झाल्या होत्या. आता राजधानी मुंबईत वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांचा जीव शनिवारी थोडक्यात बचावला. दुचाकीवरून न्यायालयात जात असताना नायलॉन मांजाने त्यांचा गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने राकेश गवळी बचावले.

राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. पोलिसाच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावून आले. त्यांनी गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. याबाबत समजताच तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी पोलीस उपायुक्त  परमजीत सिंग दहिया यांनी त्यांना व्होकार्ट रुग्णालयात हलविले. त्यांच्या गळ्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करून 10 टाके टाकण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव बचावला.

दरम्यान, राज्य सरकारनं 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here