पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत भाजपाचे पानिपत.

53

पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत भाजपाचे पानिपत.

BJP's Panipat in Punjab Local Bodies Elections.
BJP’s Panipat in Punjab Local Bodies Elections.

प्रतीनिधी 18 फेब्रुवारी
पंजाब:- मध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली होती. भाजपा खासदार सनी देओल यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला असून पंजाबमध्ये भाजपचे अक्षरश: पानिपत झालेले पहायला मिळते आहे.

पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी आठ नगरपालिका, 109 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठा झटका बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

BJP's Panipat in Punjab Local Bodies Elections.

सनी देओल यांचा मतदारसंघ असणाऱ्या गुरुदासपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराला फक्त नऊ मतं मिळाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपाच्या किरण कौर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना अवघी नऊ मतं मिळाली आहेत. यामुळेच संतप्त झालेल्या किरण कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिलं होतं. तरी देखील फक्त 9 मतं कशी पडली असा सवाल विचारत काँग्रेसवर तोंडसुख घेतले आहे.

“माझ्या घरातच 15 ते 20 सदस्य आहेत. त्या सर्वांनी मलाच मत दिलं आहे. तसेच आमच्या सर्व शेजाऱ्यांनीही मला मत देण्याचे वचन दिलं होतं. तरी देखील मला फक्त 9 मतं पडूच कशी शकतात” असा सवाल किरण कौर यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेस पक्षाकडून खोट्या सह्या आणि मतदान यंत्र बदलण्यात आल्याचाही दावा देखील किरण यांनी केला आहे. काँग्रेसने मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप देखील किरण कौर यांनी केला आहे.

भाजपा खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर मतदारसंघातील सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला असून या जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.

मजिठामध्ये 13 पैकी 10 जागांवर अकाली दलाने, तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने 11 तर अकाली दलाने 2 जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमधील सर्व 15 जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. जलालाबादमध्ये 17 पैकी 9 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसने विजय मिळवला आहे. राजपूरामध्ये 27 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका मांडली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे.