लग्नाना झाले होते फक्त तीन महिने, संशयातून पतीने केला पत्नीचा खून.

नागपूर:- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असून, सतत प्रियकराशी बोलते, अशा संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या पतीने पत्नीचा लाकडी दांड्याने मारून खून केला. ही थरारक घटना घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉ उमिया एमआयडीसी येथे उघडकीस आली. ज्योती ललित मार्कंडे 23 असे मृत विवाहितेचे नाव असून ललित मार्कंडे 26 असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित हा मुळचा राजनांदगाव (छत्तीसगड) येथे राहणारा आहे. तीन वर्षांपूर्वी तो नागपुरात आला होता. उमिया एमआयडीसी येथील पूर्वी ट्रेडिंग या आरामशीनमध्ये तो कामाला होता. त्याच्यासोबत काही नातेवाईक देखील आरामशीनमध्ये कामाला होते. सर्वजण एकत्र जेवण करून आपापल्या रूममध्ये झोपायला जात असत.
नेहमीप्रमाणेच सोमवारी रात्री 11 वाजता ललित आणि ज्योती यांनी इतर नातेवाईकांसोबत जेवण केले. त्यानंतर दोघेही दुसऱ्या बाजूला झोपायला गेले. मात्र, ललित हा ज्योतीवर संशय घेत असल्याने त्यांच्यात कुरबूर सुरूच होती. रात्रीच्या वेळी ज्योती ही झोपेत असताना ललित लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून ठार केले आणि पळून गेला. सकाळ झाली तरीही ती झोपेतून न उठल्याने एक नातेवाईक त्यांच्याकडे गेला असता ज्योती ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. ललित तेथे नव्हता.
याची माहिती पारडी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पारडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबवून गावाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ललीतला पोलिसांनी पकडले. याप्रकरणी पारडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून ललीतला अटक केली आहे.
पत्नीचा खून केल्यानंतर ललीत घरातून पळून गेला. तो जबलपूरला जाण्याच्या तयारीत होता. त्याने घरातील सर्व पैसे घेतले आणि हायवे हायलाईफ फॅमिली रेस्ट्रॉरेंट, उमरेड रोडवर गेला. तेथे वाहनाची वाट पाहत असतानाच पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढले. त्यावरून त्याला शहर सोडून जाण्यापूर्वीच अटक केली.
तीन महिन्यांपूर्वी ललीत आणि ज्योतीचे लग्न झाले होते. ज्योती ही नागपुरातील रहिवासी होती. लग्नानंतर तो ज्योतीला घेऊन आरामशीन येथे आला होता. काही दिवस चांगले गेले. त्यानंतर तो ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. ज्योती फोनवरून कुणाशीतरी रात्री उशिरापर्यंत तसेच अनेकदा ललीतच्या चोरून बोलत होती. त्यामुळे त्याचा संशय आणखीनच बळावला होता. त्यावरून त्यांच्यात कुरबूर सुरू होती. पती-पत्नीचा वाद असल्याने इतर नातेवाइकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते.