स्पॉटलाईट: भाकीत उष्णतेच्या लाटेचे

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

यावर्षी देशभर कडाक्याची थंडी पडली. विशेषतः डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात अतिशय कडाक्याची थंडी पडली. जानेवारीमध्ये तर सर्व शहरांचे तापमान नीचांकी स्तरावर पोहचले होते. आता फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अचानक थंडी गायब झाली आणि उष्णता वाढली. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा थंडीने पुनरागमन केले तर सध्या अतिशय विचित्र प्रकारचे हवामान अनुभवयास मिळत आहे.

सकाळी सकाळी गार वाऱ्यांसह कडाक्याची थंडी असते तर दुपारी कमालीचे गरम होते. गुरुवारी पुण्यातील सकाळचे तापमान ९.४ अंश सेल्सिअस होते. तर दुपारचे तापमान ३४ अंश सेल्सिअस होते. राज्यातील सर्वच शहरात जवळपास हेच तापमान आहे. सकाळी हुडहुडी भरणारी थंडी तर दुपारी घामाच्या धारा. वातावरणातील या बदलाने अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. वातावरणातील या बदलाने थंडी, खोकला आणि सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. लहान मुलांमध्ये तर थंडी तापाची साथच आली आहे. आता आपण फेब्रुवारीच्या मध्यात असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होऊ शकते.

हवामान खात्याने तर तसा अंदाजच वर्तवताना सांगितले आहे की आगामी काळात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होणार आहे. याशिवाय तापमानातील चढ उतार कायम राहणार आहे. इतकेच नाही तर अधूनमधून वाहणाऱ्या उष्णतेतही चढउतार होऊ शकेल. हवामान खात्याने वर्तवलेली ही शक्यता चिंताजनक आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी पॅसिफिक महासागरात अल निनोचा पॅटर्न तयार होत आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर यावर्षी उष्णतेची प्रचंड लाट येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते दक्षिण भारतात यावर्षी उष्णतेची लाट येऊ शकते.

दक्षिण भारताला या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसू शकते. जुलै ते सप्टेंबर या काळात देशात अल निनोचा प्रभाव दिसून येईल. असेही हवामान खात्याने सांगीतले आहे मात्र उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेने सर्वांची चिंता वाढली आहे. मागील वर्षीही उष्णता मोठया प्रमाणात वाढली होती मात्र यावर्षी उष्णतेच्या लाटेचे प्रमाण अधिक असल्याने चिंता अधिक वाढली आहे. अल निनोच्या प्रभावाने जगभर वातावरणात बदल होत आहे. जगात एकाच वेळी वेगवेगळे हवामान पहावयास मिळत आहे. जगात कुठे उष्णतेची लाट अनुभवयास मिळते तर कुठे प्रचंड पाऊस पाहायला मिळतो तर कुठे कडाक्याची थंडी अनुभवयास मिळत आहे. अल निनोचा प्रभाव भारतासह जगातील सर्वच देशांवर पडत असल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here