कोरोना रुग्णांसाठी राजुरा येथे 100 आॉक्सिजन बेड आणि आवश्यक सुविधा सुरू करा.
आमदार सुभाष धोटे यांच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सुचना.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- राजुरा येथे नुकतेच आमदार सुभाष धोटे यांच्या अथक परिश्रमाने पुर्णत्वास आलेल्या 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला. मात्र सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत असून कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामुळे राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका, ऑक्सिजन बेड, औषधे आणि आवश्यक सेवा राजुरा येथेच उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे 100 आॉक्सीजन बेड व आवश्यक सुविधा, डॉक्टर तातडीने सुरू करून देण्याबाबतच्या सुचना आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा चिकिस्तक निवृत्ती राठोड यांना दिलेल्या आहेत.
संपूर्ण देश, महाराष्ट्र, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील अपुऱ्या सुविधांअभावी अनेक कोरोना रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध कोविड सेंटर अधिक कार्यक्षम करून स्थानिक रुग्णांना राजुरा येथेच सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांचेवर कोरोना संबंधित उपचार प्रभावीपणे करण्यात यावेत यासाठी येथे सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेल्या आहेत.