हरकोल कोंड हनुमान जन्मोत्सव २०२५ मोठ्या जल्लोषात साजरा…
✍️विकास आग्रे ✍️
गोरेगाव माणगांव प्रतिनिधी
📞 93266 60640📞
माणगांव: माणगाव तालुक्यातील हरकोल कोंड या गावी गेली ४६ वर्षांपासून हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. सारे भक्तजण आजही तितक्याच भक्तिभावाने ह्या सोहळ्याची पावित्र्यता जोपासताना दिसतात. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम तसेच नवनवीन उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत नेहमीच नवा आदर्श घडवण्याचा प्रयत्न हा गावकऱ्यांकडून केला जातो. ह्यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असेल, शाळकरी मुलांसाठी विविध चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन त्यानंतर बक्षिस वितरण करुन त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष प्रयत्न असतो.
तसेच यंग स्टार क्रिकेट संघाचा देखील यथोचित सन्मान सोहळा टोपी व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच अतिशय प्रतिष्ठेच्या मानला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ” ह्या वर्षी गावातील जेष्ठ किंबहुना कार्यकुशल, कणखर आणि खंबीर नेतृत्व अशी ओळख असलेल्या श्री. पांडुरंग भागोजी गोलांबडे उर्फ आण्णा यांना गौरविण्यात आले. आण्णांच्या जीवन कारकिर्दीवर नजर टाकली तर अण्णांचे ८५ वय वर्षे ह्यातच अनेक पद त्यांनी भुषविलेली आहेत. एखाद शुभ कार्य असो किंवा दुःख घटना आण्णा ह्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. गावकार्य असो, समाजकार्य, अगदी राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. गावचे पोलीस पाटील तसेच कुणबी समाज सेवा संघ बावीशी विभागाचे ते न्यायदान अध्यक्ष अशी प्रतिष्ठेची पद त्यांनी आपल्या कारकिर्दीत भुषविलेली असतांना त्यांच्या ह्याच मौलिक कार्याची दखल घेत हरकोल कोंड मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सन्मानार्थ “जीवन गौरव पुरस्कार” देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनिल पाष्टे तसेच स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. यशवंत पदरत व महिला मंडळ अध्यक्षा सौ. दिप्ती काप यांच्या हस्ते देऊन आण्णांना गौरविण्यात आले. खरंतर आण्णांचे सामाजिक कार्य हे आजच्या तरुणाईला आदर्शवत ठरणारे आहे. अशा धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने हा हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२५ यशस्वीपणे पार पडला.