जिल्ह्यातील दारूबंदी हटवून मिळणाऱ्या महसुलातून कोरोना योद्ध्याचे वेतन करावे: कॉ. राजू गैणवार

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- कोरोना काळात अनेक कोरोना योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता अप्रत्यक्ष कोरोनाशी युद्ध करीत आहे. त्याचा त्यांना आर्थिक मोबदला मिळत नसल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडत आहे.शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटवून त्यामाध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून कोरोना योद्धयांचे वेतन करावे. अशी मागणी भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाचे जिल्हासहसचिव कॉ. राजू गैणवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या दीड वर्ष्यापासून आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनाचा संसर्ग संपविण्यासाठी औषधोपराव्यतिरिक्त लोकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने नागरिकांसोबत शासनाची आर्थिक बाजू काकुवत झाली आहे. यात कोरोना विषाणूस संपविण्यासाठी डॉक्टर, शास्त्रज्ञ यांचेसह अनेक क्षेत्रातील कोरोना योद्ध्ये रात्रंदिवस आपल्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता कार्य करीत आहे. परंतु त्यांना या कामाचा मिळणारा मोबदला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडत असून त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हिच स्थिती आहे. याठिकाणी गेल्या 6 वर्षांपासून दारूबंदी आहे. त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही दारूबंदी फसली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात दारू सुरु आहे. त्याच धरतीवर जिल्ह्यातील दारूबंदी हटवावी आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांचे वेतन करावे. अशा आशयाच्या मागणीच्या निवेदनाद्वारे कॉ. राजू गैणवार यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्य उत्पादन शुल्कमंत्री, पालकमंत्री, यांचेकडे केली आहे.