उद्धव ठाकरेंचा मनस्ताप वाढला, एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी केली बरखास्त

अजित दुराफे 

मुंबई महानगर प्रतिनिधी

 मो: 77180 9519

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे यांनी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली आहे तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली गेली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे १४ खासदारही उपस्थित होते.

शिंदे गटाने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये रामदास कदम, आनंदराव आडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांची उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.दरम्यान, शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही शिंदे गटात स्थान देण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरील फूटही उद्या होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील राजकीय घडामोडी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आज शिंदे गटाच्या बैठकीसाठी शिवसेनेचे १४ खासदार उपस्थित होते. त्यामुळे ५५ पैकी ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे आता खासदारही शिंदे गटात जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिंदे यांनी सेनेचे जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे शिवसेनेसाठी पुढील मार्ग खूप खडतर राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here