जामठी – सावळदबारा रस्त्याचा तिढा सुटला ; गोद्री – पळासखेडा शिवारात रस्ता करण्यासाठी वनविभागाची परवानगी
मनोज एल. खोब्रागडे
सहसंपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर -986002001
सोयगाव ( प्रतिनिधी ) दि. 18, तालुक्यातील गोद्री – पळासखेडा शिवारातील वनविभागाच्या जागेतून रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभाग नागपूर यांनी अंतिम परवानगी दिल्याने जामठी – सावळदबारा रस्त्याचा तिढा सुटला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाने 50 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मिटला असून आता सावळदबारा गावांकडे जाणाऱ्या नागरिकांचे 30 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. यामुळे सावळदबारा सर्कलच्या जवळपास 14 गावांना याचा फायदा होणार आहे.
असे होणार अंतर कमी
फर्दापूर हुन सावळदबारा कडे जाण्यासाठी जामनेर तालुक्यातील फत्तेपुर मार्गे जावे लागते. आता फर्दापूर हुन थेट जमठी गोद्री -पळासखेडा मार्गे जाता येईल. यामुळे जवळपास 30 किलोमीटर अंतर कमी होणार असून पळासखेडा, टिटवी, सावळदबारा , देव्हारी, पिंपळवाडी, महालब्धा, हिवरी, मोलखेडा, घाणेगाव, घाणेगाव तांडा, चारुतांडा, नांदा तांडा, नांदा, डाभा आदी गावांना याचा फायदा होणार आहे
1976 पासून प्रस्ताव होता प्रलंबित
सन 1976 पासून याबाबतचा प्रस्ताव प्रलंबीत होता. 2009 साली आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला. यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी केंद्र व राज्यसरकार तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथील वनविभागात कायम पाठपुरावा केला. अखेर आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश आल्याने 50 वर्षा पूर्वीचा प्रश्न मार्गी लागला.
अशी देण्यात आली परवानगी
गोद्री – पळासखेडा शिवारातील वनविभागाच्या क्षेत्रातून 5 किलोमीटर लांबीचा रस्ता करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून 1 कोटी 90 लाख रुपयांचे चलन सरकारला भरण्यात आले. तसेच निमखेडी शिवारातील 9 . 24 हेक्टर गायरान जमीन वन विभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे.
गेल्या 50 वर्षांपासून जामठी – सावळदबारा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. अनेक दिवसांपासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. वनविभागाने त्यांच्या क्षेत्रातून रस्ता करण्यासाठी परवानगी दिल्याने या भागातील लोकांना न्याय मिळाला आहे. यासाठी सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्या असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.