सुशिक्षित बेरोजगार तरूण आजही न्यायाच्या प्रतिक्षेत…

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली

एकाच्या हाताला काम तर दुसरा काम शोधण्यासाठी वणवण भटकत फिरत आहे एक तुपाशी तर दुसरा उपाशी दिसत आहे एकजण खाऊ शकत नाही तेवढे त्याच्याजवळ भरमसाट आहे तर दुसरा एक, एक रूपया कमविण्यासाठी जिवाचे रान करत आहे आजच्या घडीला अशी भयकंर परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे या लोकांनी न्याय तरी कोणाला मागायला जावे…? वाढती बेरोजगारी अन् हाताला नीट काम न मिळाल्याने असे अनेक सुशिक्षित तरूण ,नको त्या मार्गाने जात आहेत याला जबाबदार कोण आहे. ..? दिवसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारी सुशिक्षित तरूणांना मृत्यूच्या दाराजवळ नेत आहे,व्यसनाच्या आहारी जात आहेत वरतून त्यांचे आईबाबांना चिंतेने ग्रासलेले आहेत अशा सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य तरी कसे उज्ज्वल व्हावे…? हा एक मोठा भारी प्रश्न आहे.

ह्या महत्वाच्या विषयावर कोणीही बोलत नाही खुर्चीच्या लालसेपोटी आपपसात लढत आहेत व स्वार्थी होऊन जगत आहेत त्यामुळे देशात असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांचे वाली आहेत की,नाही फारसं दिसून येत नाही. एका अर्थाने बघायला गेले तर…अनेक वर्गात सुशिक्षीत बेरोजगार तरूण आहेत पण, ओबीसी वर्गात बहुतांश असे अनेक तरूण उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत कारण, त्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून तेवढी मदत मिळत नाही. काही तरूणांचे आईबाबा शेतकरी आहेत तर काहींचे मोलमजुरी करणारे आहेत तर काही तरूण स्वतःच काम करून उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात वास्तव्यास आहेत सर्व साधारण लोकांचे जीवन कसे असते याकडे मात्र लक्ष दिले जात नाही ही फार मोठी शोकांतीका आहे, त्यात दुसरी शोकांतिका. अशी आहे की, ओबीसी वर्गातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अशा अनेक तरूणी पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही कारण पुढचे शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची सोय दिसत नाही फार मोठी गंभीर परिस्थिती आहे. 

       या, तीन – चार दिवसात वृतपत्रात एक बातमी वाचण्यात आली होती की, जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत शिक्षक नेमनार ,शिक्षकांची कमतरता असल्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे पण, याच महाराष्ट राज्यात उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार तरूण किती आहेत त्यांचा मात्र विसर पडलेला दिसत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये एवढ्या जागा रिक्त असतांना सुध्दा सुशिक्षित बेरोजगारांचा विचार केला जात नसेल तर.. कुठेतरी त्यांच्या जिवंतपणाच्या अपेक्षांची अंतयात्रा निघत आहे म्हणायला काहीच हरकत नाही .

आजचा सुशिक्षित बेरोजगार तरूण न्यायाच्या प्रतिक्षेत वाट बघत आहे एकदातरी न्याय मिळावा पण, त्यांचा विचार केला जात नसेल तर मात्र‌ विचारच करायला लावणारी बाब आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूण खेडोपाड्यात, शहरात सुध्दा बहुसंख्येने आहेत त्यांचा विचार कोणी करावा. ..? असेच जर शासनाने पाठ फिरवली तर…त्यांच्यात नैराश्याची भावना तर येणारच आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरूणाला अपेक्षा असतेच पण,ती अपेक्षा पुर्ण होत नसेल तर…त्यांनी शिक्षण तरी कशासाठी घ्यावे. …? एवढ्या जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना घेण्यात यावे, त्यांचा विचार केला जावा. त्यांची कदर केली जावी, त्यांचे कष्ट जाणावे, त्यांचेही स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, त्यांचा चालत असलेला संघर्ष बघावा, नैराश्याची भावना ठेवून नको त्या वाटेने जाण्यापासून थांबवावे आणि कुठेतरी त्यांच्या शिक्षण घेण्याला अर्थ लागला पाहिजे असा न्याय करावा.

या वाढत्या महागाईमुळे व हाताला नीट काम न मिळाल्याने सुशिक्षित तरूण बेरोजगार झालेला आहे, हाल अपेष्टा सहन करत आहे आणि न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत . म्हणून त्यांचा विचार करणे आज काळाची गरज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here