आंतरराष्ट्रीय हेलियम दिवस विशेष: विजयदुर्ग किल्ला कशाचा साक्षीदार?
_महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गातील विजयदुर्ग जसा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचाही साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरून हेलियमचा शोध लावला होता. विजयदुर्ग किल्ल्यावर मुक्कामी असतांना सूर्याभोवती असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायू असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा इंटरनॅशनल हेलियम डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.
हेलियमचा शोध दि.१८ ऑगस्ट १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नाव हे ग्रीक भाषेतील हेलियॉस अर्थात सूर्य या अर्थाच्या शब्दावरून ठेवण्यात आले. हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायुरूपातच सापडतो. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो.
१८ ऑगस्ट हा जागतिक हेलियम दिवस म्हणून साजरा केला जातो. सन १८६८ साली या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव हेलियसच्या नावावरून हेलियम हे नाव पडले. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्युलस जेनसिन याने सूर्यग्रहणाच्या वेळी पिवळ्या ज्वाळेच्या रुपात हेलियम शोधला. जोसेफ नॉर्मन लॅकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञानेही सूर्यावर पिवळी रेषा पाहिली. दोन्ही शास्त्रज्ञांची निरीक्षणे फ्रेंच सायन्स अकॅडमीकडे एकाच वेळी पोहोचली; म्हणून हेलियमच्या संशोधनाचे श्रेय दोघांकडेही जाते. मात्र, त्या वेळी इतर शास्त्रज्ञांना दोघांच्या निरीक्षणावर व नवीन वायूच्या शोधावर विश्वास नव्हता. तीस वर्षांनंतर स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम रामसे याने युरेनियमच्या खाणीत पृथ्वीच्या पोटातील एक नवीन वायू शोधला. शेवटी दोन्ही शास्त्रज्ञांचा फ्रेंच सरकारने सुवर्णपदके देऊन सत्कार केला. अशाप्रकारे हेलियमच्या संशोधनात तिन्ही शास्त्रज्ञांचे नाव घेतले जाते.
सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो. विजयदुर्गचे महत्त्व लक्षात राहावे; म्हणून दी बिग डिस्कव्हरी संस्थेने खगोलशास्त्राला चालना मिळावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने सायन्स सेंटर स्थापण्याची घोषणा केली आहे. यात खगोलशास्त्रीय प्रदर्शन, तारांगण व माहिती केंद्राचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला पूरक म्हणून एक सांस्कृतिक प्रदर्शनही करण्यात येणार होते. हेलियम हा असा एक घटक आहे, की जो प्रथम पृथ्वीवर न शोधता अवकाशात शोधला गेला. त्याचा अणूक्रमांक २ आहे. हा रंग, वास व चवविरहित असा वायू आहे. हा बिनविषारी व एकाणू वायू आहे. याचा समावेश नोबल गॅस ग्रुपमध्ये होतो. हायड्रोजननंतर हा दुसरा हलका वायू आहे. निरीक्षण विश्वातील हा दुसऱ्या क्रमांकावर असलेला मुबलक घटक आहे.
रोजच्या जीवनात हेलियमचे अनेक उपयोग आहेत. सर्वांत प्रचलित व माहिती असलेला याचा उपयोग म्हणजे फुग्यात भरण्यासाठी व तो हवेत उडवण्यासाठी. स्कुबा डायव्हिंगमध्येही याचा उपयोग करतात. श्वास घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाकीत २० टक्के ऑक्सिजन व ८० टक्के हेलियम असतो. डायव्हर्सना अतिरिक्त वजन घ्यावे लागू नये; म्हणून हा उपयुक्त ठरतो. बारकोड व एमआरआय स्कॅनर्समध्ये याचा उपयोग होतो. अवकाश दुर्बिणीचे तापमान थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. वेल्डिंग करण्यासाठी, निऑन लाइट्समध्ये, अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी, स्फोटके बनवण्यासाठी आदी अनेक गोष्टींत हेलियमचा उपयोग होतो.
सन २००६ सालापासून हेलियम या वायूच्या उपलब्धतेत कमतरता जाणवू लागली आहे. दर वर्षी सिंधु भूमी फाउंडेशनतर्फे जागतिक हेलियम दिवस विजयदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जातो. शालेय मुलांकडून हवेत फुगे सोडले जातात. शास्त्रज्ञांची किंवा संबंधितांची भाषणे होतात व १८ ऑगस्ट हा विशेष दिवस साजरा केला जातो.
!! विश्व हेलियम दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– श्री के. जी. निकोडे गुरूजी
रामनगर वाॅर्ड नं.२०, गडचिरोली
मो – 7775041086