वेसाव्याचा ऐतिहासिक जल्लोष — सव्वाशे वर्षांची भाल्याने हंडी फोडण्याची परंपरा कायम!
डोंगरीकर तरुण मंडळ*
मुंबई, वेसावा यंदाचा मानकरी
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- वेसावा कोळीवाड्याचा सर्वात प्रतिष्ठेचा आणि थरारक असा सामायिक दहीहंडी उत्सव यंदा साजरा झाला असून, १२५ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या भाल्याने हंडी फोडण्याच्या अद्वितीय परंपरेचा यंदा डोंगरीकर तरुण मंडळ मानकरी ठरले.
गावाची मानाची परंपरा वेसावा कोळी जमातीच्या पंचायतन परंपरेनुसार, सामायिक दहीहंडीचा मान प्रत्येक गल्लीला नऊ वर्षांनी मिळतो. यंदा २०२५ मध्ये हा मान डोंगरीकर तरुण मंडळाकडे गेला होता.हा उत्सव वेसाव्याचा अभिमान आणि कोळी संस्कृतीचा वारसा मानला जातो.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराची महाआरती करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
श्रीराम मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू झालावर दररोज पारंपरिक वेशभूषा, नटून-थटून, स्त्री-पुरुष आणि लहान-थोर मंडळी हरिनामाच्या गजरात अभंगांची मांदियाळी सजवली जाते.गावात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करून उत्सवाचा थाट वाढवला जातो.
कृष्ण जन्मोत्सवाची महायात्रा संपूर्ण गावातून काढली जाते.या वेळी हजारो भाविक निरनिराळ्या वाद्यवृंदांसह हरिनामाचा जप करत मिरवणुकीत सहभागी होतात.दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकराच्या मुहूर्तावर भाल्याची मिरवणूक काढून मानाची दहीहंडी फोडली जाते.
या वेळी हंडी फोडण्याचा मान अध्यक्ष प्रशांत चिखले,सचिव जितेंद्र चिंचय,सहसचिव पंकज कोळी, खजिनदार केदार चिंचय व सर्व पदाधिकारी यांना मिळाला.
या ऐतिहासिक परंपरेचे चित्रीकरण आणि वार्तांकन करण्यासाठी यंदा विविध टीव्ही चॅनल्स, यूट्यूब ब्लॉगर्स आणि प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली होती.