अवयवदान जनजागृतीसाठी धावली युवापिढी

अवयवदान जनजागृतीसाठी धावली युवापिढी

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230

चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अवयव दान विभाग व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवती यांच्यामध्ये अवयवदान संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅराथॉन स्पर्धा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती.
मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. भटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, संकल्प संस्थेचे अध्यक्ष आशिष काळे, प्रशिक्षक रोशन बुजाडे, समुपदेशक योगेंद्र इंदुरकर, ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव सुरेश अडपेवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर उपस्थित होते.
दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी ‘जागतिक अवयव दान दिवस’ साजरा केला जातो. मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव, दान केल्यास अधिक जीव वाचतील. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे इत्यादी अवयव दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचू शकतात, निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे असंख्य लोक आपले प्राण गमावतात, जे अवयव दानामुळे वाचू शकतात, याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.हेमचंद कन्नाके यांनी उपस्थित स्पर्धकांना अवय दान विषयी शपथ दिली.
विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरातर्फे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, संबोधन ट्रस्ट व विहान प्रकल्प प्रतिनिधींनी सहकार्य केले.