*एका लाखात खरेदी केली नवरी ती नांदली फक्त एक रात्र*
या घटनेचा धसका घेतलेल्या युवकाने केली विष घेऊन आत्महत्या…
जळगाव:- राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या ठिकाणी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने लग्नाळू मुलांना मुलींसाठी खूप फिरावे लागते. या राज्यात तर लग्नासाठी पैशे मोजून मुली विकत घेतल्या जातात. आता हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील पहावयास मिळत आहे. मुली उच्चशिक्षित झाल्याने आणि मुले बेरोजगार किंवा शेती करणारे असल्याने मुलांना मुली मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात देखील प्रॉपर्टी ब्रोकर सारखे ‘ दलाल’ सक्रिय झाले आहेत.फक्त त्यांच्यासाठी ‘मध्यस्थ‘ शब्द वापरला जातो. या क्षेत्रात महिला जास्त सक्रिय आहेत. अश्या प्रकरणात मूलाकडील मंडळींची फसगत देखील होत असते.एका घटस्फोटित युवकाचा विवाह अश्याच महिला मध्यस्थांच्या मध्यस्थीने लावून देण्यात आला होता. परंतु नववधू दुसऱ्याच दिवशी पळून गेल्याने धक्का सहन न झालेल्या मुलाने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार कैलास संतोष चौरे (रा.सामसोद, ता.जामनेर ) हा गेल्या १२ वर्षांपासून कुसुम्बा येथे आपल्या बहिणीकडे राहून येथील एमआयडीसी मध्ये चटई बनविण्याच्या कंपनीत काम करीत होता. पण चार वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाल्याने तो दुसऱ्या लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. पण पहिल्या लग्नासाठी मुलगी मिळायला त्रास जात असतांना दुसऱ्या लग्नासाठी मुलगी मिळणे अशक्य असे होते. अश्यातच त्यांना शहरातील शनिमंदिराजवळ राहणाऱ्या लिलाबाई उर्फ भाभी लग्न जुळवण्याचे काम करीत असल्याचे समजले. कैलास ची आई, बहीण आणि मेहुणे यांनी लिलाबाई हिची भेट घेतली असता तिने या कामात त्यांना मलकापूर येथील महिला उज्वलाबाई उर्फ संगीताबाई मदत करू शकते असे बोलून त्यांची भेट घालून दिली.
या दोघींनी कैलास सोबत लग्न लावून देण्यासाठी एक लाख रुपये लागतील अशी बोली केली. दुसरे लग्न असल्याने आणि मुलगी मिळत असल्याने कैलास आणि त्याच्या घरच्या मंडळीने होकार दर्शविला. कैलास ला एक १८ वर्षीय मुलगी दाखवून लग्न लावून दिले. कैलास तिला घेऊन कुसुम्बा येथे आला. आणि सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला नववधू गायब दिसली. जातांना ती कैलास चा मोबाईल देखील घेऊन गेली होती. आपली फसगत झाल्याचे कैलास च्या लक्षात आल्यावर तो लिलाबाई कडे पोहोचला आणि आपले पैसे परत मागू लागला. पण लिलाबाईने पैशे देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे नैराश्येतून कैलास ने शनी मंदिरा जवळील पोलीस चौकीतील ओट्यावर विष घेतले. ही बाब घरच्या मंडळीला कळल्यावर त्यांनी त्याला खाजगी दवाखान्यात भरती केले पण त्याला वाचवता आले नाही.
कैलास चे मेहुणे संतोष पाटील (३२) यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी नववधू, लिलाबाई आणि संगीताबाई उर्फ उज्वलाबाई यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोन मध्यस्थ महिलांना अटक केली आहे.