*नात्याचे भान विसरून प्रेमात आंधळे झाले, मावस भाऊ-बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या!*
मोहोळ:- प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही, नात्यागोत्याचे भान विसरून प्रेमात आंधळे झालेल्या मावस भाऊ-बहिणीने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली. ही घटना मोहोळ तालुक्यातील नरखेड गावात घडली. गुरुवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
प्रतिक्षा समीर शिंदे वय १६ वर्षे प्रशांत रविंद्र (बापू) शिंदे वय २० वर्षे (दोघे रा. नरखेड ता. मोहोळ अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रतिक्षा समीर शिंदे आणि प्रशांत रविंद्र (बापू) शिंदे हे दोघे सख्खे मावस भाऊ बहिण आहेत. मात्र भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासत दोघेही वासनेच्या आहारी गेले होते. प्रशांत शिंदे याला आई वडील नाहीत. त्याचे शिक्षण पुणे येथे झाले होते. पारधी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे समाजसेवक गिरीष प्रभुणे यांच्याकडे तो शिक्षण घेत होता. साधारण पाच वर्षांपूर्वी तो आपल्या आजीकडे नरखेड तालुका मोहोळ येथे आला होता. त्याची सख्खी मावशी नरखेडमध्येच राहण्यास असल्यामुळे त्यांच्या घरी त्याची सतत येणे झाले होते.
दरम्यानच्या काळात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सख्या मावशीची मुलगी प्रतिक्षा हिच्याबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकमेकांवर प्रेम करु लागले. सोबत जीवन मरणाच्या शपथा, अनाभाका होऊ लागल्या. पण भावा बहिणीचे पवित्र नाते विसरून आपण चुकीचे कृत्य करीत असल्याचे त्यांना भानच राहिले नव्हते. अखेर या अनैतिक नात्याची कुणकुण दोघांच्याही घरच्यांना लागल्याने त्यांनी दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर आभासी दुनियेत जगत असलेल्या या दोघाही प्रेमीयुगुलांना आपण पाप करून भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासल्याची जाणीव झाली. तेव्हापासून दोघेही तणावात वावरत होते.
बुधवारी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजल्यानंतर कुणालाही माहिती न होता दोघेही घरातून बाहेर पडले. त्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या बाळासाहेब शंकर पाटील यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला प्रशांतने ओढणीने तर प्रतीक्षाने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी दुपारी १२ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रीतसर पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर दोघांच्याही नातेवाईकांनी मोठी गर्दी करून आर्त टाहो फोडला. याठिकाणी परस्परविरोधी आरोप केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
या प्रकरणी मोहोळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली. मात्र आमच्या मुलाचा मुलीच्या आईवडिलांनी काटा काढला आहे. दोघांचाही खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप प्रशांत शिंदे याचे चुलते लालू व्यंकट शिंदे यांनी केला. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. मात्र दोघांनीही गळफासाने आत्महत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. घातपात झाल्याचा संशय येईल असा कोणताच परिस्थितीजन्य पुरावा नाही. तरीही डॉक्टरांच्या अहवालानंतर याबद्दल बोलता येईल असे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत. या घटनेमुळे नरखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोघांवरही नरखेड तालुका मोहोळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र मुलगा आणि मुलगी याच्या नातेवाईकात दोन गट पडल्याने अंत्यविधीच्या ठिकाणी संघर्ष निर्माण होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून मोहोळ पोलिस प्रशासनाने नरखेड गावात मोठा फौजफाटा तैनात केला होता.