मूर्तिकार प्रदीप ठाकूर यांनी जपली आहे कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव

रत्नाकर पाटील

अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वाघविरा या गावातील गणेश मूर्तीकार प्रदीप चिंतामण ठाकूर यांनी आपल्या कलेची आवड जोपासत १९८४ सालापासून मातीच्या गणेश मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले ते आजतागायत ४० वर्षे उलटून गेली तरीही त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर महागाईच्या काळातही आपली कला जोपासली आहे. त्यांनी चालू वर्षात ४०० गणेश मूर्ती घडविण्याचे काम केले असून त्यापैकी बहुतांश मूर्ती या शाडूच्या मातीच्या मूर्ती असून पंचक्रोशीतील अनेक घरांपर्यंत प्रदीप ठाकूर यांनी तयार केलेल्या मूर्तींना जास्त मागणी आहे.

त्यांना या व्यवसायात त्यांचा मुलगा केतन प्रदीप ठाकूर तसेच भाऊ संतोष ठाकूर,राजेंद्र ठाकूर, सहकारी मूर्तिकार जीवन पाटील, महादेव पाटील, निपुल पाटील, गणेश पाटील, जयवंत पाटील, साक्षी ठाकूर, तिर्था पाटील, प्राप्ती पाटील, करण पाटील या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी शाडूच्या मातीच्या मूर्तींनाच जास्त मागणी होती परंतु २००८ ते २०१० पर्यंत पीओपीच्या मूर्तींची मागणी केली जात होती परंतु लवकरच प्लास्टिक बंदी व पर्यावरणाचा होणारा -हास टाळण्यासाठी पुन्हा एकदा मातीच्या मुर्तींनाच प्राधान्य दिले जात आहे. १९८९ साली झालेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात मूर्तींचे नुकसान झाले होते परंतु त्यावेळी शासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही.

मला शासनाला इतकेच सांगावेसे वाटते की मूर्तिकार हे आपली संस्कृती जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात आणि असे असताना शासनाने मूर्तिकारांच्या कलेला दाद, प्रोत्साहन देत त्यांच्यासाठी विशेष सोयी सवलती, निधी, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे परंतु शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कारण मूर्तिकरांसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या योजना किंवा लाभ दिला जात नाही त्यामुळे आमच्यासारखे ग्रामीण भागातील मूर्तिकार हे निव्वळ आपली कला जोपासण्याच्या दृष्टिकोनातून या व्यवसायात आजपर्यंत टिकून आहेत. मूर्तिकार प्रदीप ठाकूर व केतन ठाकूर यांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती आज अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी पोहोचत आहेत व त्यांचा हा वारसा पुढे त्यांचा मुलगा केतन ठाकूर देखील चालवीत आहे. सुंदर, सुबक, कमी दरात योग्य आकारणी करीत सामाजिक बांधिलकी जपून गरीब गरजू व आदिवासी बांधवांना गणेश मूर्ती स्वस्त दरात उपलब्ध करून देत खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीची जपवणूक हे कुटुंब करीत आहे.

या व्यवसायातून प्रतिवर्षी १० ते १२ स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. १ ते ४ फुटापर्यंत मूर्ती तयार करून विशेष म्हणजे ओरिजनल पितांबर, फेटे आणि आंबा या मूर्तींना जास्त मागणी आहे. ठाकूर कुटुंबियांनी बनविलेल्या शाडूच्या मूर्ती ह्या पेण, पनवेल, मुंबई या ठिकाणी विक्री पोहोचल्या आहेत. त्यांना या कामी समस्त वाघविरा गावातील ग्रामस्थांचे सहकार्य मिळते हे ते आवर्जून सांगतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here