डहाणू तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांतील दर्जा सुधारण्यासाठी दृष्टीकोन सामाजिक संस्थेचे निवेदन

27

डहाणू तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांतील दर्जा सुधारण्यासाठी दृष्टीकोन सामाजिक संस्थेचे निवेदन

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

डहाणू :- डहाणू तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये लहान बालकांना, गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थ व लाभार्थ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. तसेच शैक्षणिक साहित्याची कमतरता, धान्य साठवणीच्या सोयींचा अभाव आणि नियमित आरोग्य तपासणीत होणारा विलंब या कारणांमुळे बालकांचे पोषण, आरोग्य व सर्वांगीण विकास धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तातडीने सुधारणा करण्याची मागणी दृष्टीकोन सामाजिक संस्था, पालघरने महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

संस्थेने स्पष्ट केले मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास भविष्यात जिल्हास्तरावर जंम्बो शिष्टमंडळ नेऊन जाब विचारला जाईल.

यावेळी संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट दिली असता तालुक्यातील प्रमुख कार्यालय असूनही तेथे भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचा अभाव असल्याचे आढळले. त्यानंतर संस्थेच्यावतीने दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा प्रोत्साहनपर भेट म्हणून देण्यात आल्या.

या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष अभिजीत देसक, सचिव सुधीर घाटाळ खजिनदार डॉ. अक्षय गडग, सहसचिव कौशल कामडी, सदस्य प्रविण वरठा, जिल्हा समन्वयक सुदाम मेरे व सदस्य हेमंत हाडळ उपस्थित होते. यावेळी CDPO सतिश पोल, विस्तार अधिकारी व सुपरवायझर सुनिता शनवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

चौकट-

या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –

१) पुरवठा होणाऱ्या अन्नधान्याचा नमुना तपासून निकृष्ट दर्जा आढळल्यास तातडीने सुधारणा करावी.
२) आहार पुरवठा ठेकेदार व जबाबदारांवर नियमांनुसार कारवाई करावी.
३) तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची सखोल तपासणी करून प्रत्यक्ष अहवाल तयार करावा.
४) अंगणवाडी समित्या सक्रिय करण्याच्या सूचना द्याव्यात.
५) सेवांमध्ये सातत्य व दर्जा राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.