Home latest News भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध अनुयायांनी आझाद मैदान मुंबई येथे महाबोधी महाविहार...
भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध अनुयायांनी आझाद मैदान मुंबई येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी केले ऐतिहासिक जन आक्रोश आंदोलन
विश्वास गायकवाड
९८२२५८०२३२
बोरघर / माणगाव प्रतिनिधी
माणगांव :- मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर, ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक ऐतिहासिक व तीव्र आंदोलन संपन्न झाले. ही आंदोलनाची लढाई केवळ एक सामाजिक आंदोलन नसून बौद्ध अनुयायांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांसाठी दिलेला लढा आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले. विशेषतः रायगड जिल्हा दक्षिण, रायगड जिल्हा उत्तर, मुंबई, ठाणे, पालघर यांचे मोठ्या प्रमाणावर बौद्ध आंदोलक होते. त्याचप्रमाणे वंदनीय भिक्कूगण व हजारोच्या संख्येने समता सैनिक दलाचे जवान देखील आपले कर्तव्य बजावत होते. ही निर्णायक घटना महाबोधी विहार मुक्तीसाठी अर्पण केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली. या दिवशी, म्हणजेच १७ सप्टेंबर २०२५ रोजी भारतभरात अनागरिक धम्मपाल जयंती, पेरियार रामस्वामी जयंती, यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन साजरा केला जात आहे.
भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संयमितपणे व निर्णायकपणे सरकारच्या धोरणांवर प्रहार केला. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु जी बोराडे, सरचिटणीस अशोक केदारे, उपाध्यक्ष विजय कांबळे, रायगड जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका शाखा यांच्या सर्वांगीण पाठिंब्याने आंदोलन आणखी प्रभावी बनले. विशेषतः बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी देखील आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन सरकारला स्पष्ट संदेश दिला. त्याबरोबरच, रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस नवनीत साळवी, उपाध्यक्ष नितीन मोरे, महिला अध्यक्षा अस्मिता जाधव आणि संपूर्ण कार्यकारिणीने सक्रीय सहभाग नोंदवला.
या प्रसंगी तळा, माणगाव, म्हसळा, रोहा, महाड, पोलादपूर येथून तालुका शाखा व इतर जिल्ह्यांतून कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीसह सकाळी १० वाजल्यापासून मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले.भीमराव आंबेडकर यांचे नेतृत्व व अथक संघर्ष ह्या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा उभे राहिले आहे,सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आले की, महाबोधी महाविहाराचा बौद्ध अनुयायांना ताबा मिळणे हे नैतिक व कायदेशीर दोन्ही दृष्टिकोनातून अनिवार्य आहे.भीमराव आंबेडकर यांनी सरकारला स्पष्ट आव्हान दिले की, धार्मिक स्वातंत्र्य व समाजातील समतेसाठी न्याय देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांनी जोरदारपणे सांगितले की, सरकारने तात्काळ महाबोधी विहारचा ताबा बौद्ध समाजाला हस्तांतरित करावा.आंदोलनात सहभागी लाखो अनुयायायांच्या घोषणांनी वातावरण तापले आणि सरकारच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
“महाबोधी विहार कायदा १९४९ रद्द केला जावा! महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावा!”अखेर आंदोलनाची घोषणा करत आंदोलकांनी ठामपणे सांगितले “महाबोधी विहार हमारा,राज तुम्हारा नही चलेगा. या ऐतिहासिक लढाईने समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा दिली आहे. पुढील काळात महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलने अधिक तीव्र स्वरूपात चालू राहणार असल्याचे आंदोलनाचे नेतृत्त्व जाहीरपणे व्यक्त करत आहे.