नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी 70 लाखांचा निधी

26

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसाठी 70 लाखांचा निधी

रायगड जिल्हयात 368 घरांचे नुकसान, तीन मृतांच्या वारसाना मदतीचे वाटप

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- यावर्षीच्या माैसमी पावसाच्या हंगामात वादळीवारे, अतिवृष्टीमुले नैसर्गिक आपत्तीचा सामना रायगडकरांनी केला. जिल्हयात यावर्षीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी केली आहे. प्रशासनानेही बाधितांना तात्काळ मदत करण्यासाठी कार्यवाही केली आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीतील तीन मृतांच्या वारसांना मदत देण्यात आली आहे तर घरांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून जिल्हयाला 70 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

रायगड जिल्ह्यात सात जूनपासून सुरु होणारा पाऊस यावर्षी मे महिन्यात सुरु झाला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु होऊन आॅगस्ट अखेरपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. या काळात जोरदार वादळी वारे, अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर आले. सुदैवाने प्रशासनाने पूर्व तयारी केली असल्याने मागील काही वर्षांतील आपत्तीप्रमाणे जीवित वित्त हानी झाली नाही. तरीही जिल्ह्यात अलिबाग, तळा आणि मुरुड येथे प्रत्येकी एक अशा तिघांचा नैसर्गिक आपत्तीने बळी घेतला. या तिनही मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येक चार लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. तर तर पेणमधील एक व्यक्ती जखमी झाला. या जखमीलाही मदत देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील तळा, माणगाव, सुधागड, महाड, पोलादपूर, पनवेल आणि रोहा या तालुक्यांमध्ये पशुधनाची हानी झाली आहे. चार बैल, पाच गाई आणि तीन म्हैशीचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. पाच जनावरे जखमी झाली. पशुधनाचे नुकसान झालेल्या पशुपालकांना शासकीय मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

चाैकट-
सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान
जिल्ह्यातील तळा तालुक्यात मंदिर, महाड तालुक्यात जिल्हा शाळा इमारत, मंदिर, विहीर, तलाव भिंत, स्मशानभूमी, पोलादपूर तालुक्यात सभागृह, रोहा तालुक्यात भात खरेदी केंद्र, मुरुड तालुक्यात मराठी शाळा, अलिबागमध्ये स्मशानभूमी, म्हसळयात संरक्षक भिंत यांनी अंशत अथवा पूर्णत नुकसान झाले आहे.

घरांचे नुकसान
जिल्हयातील कर्जत 1, खालापूर 1, पाेलादपूर 2 अशा चार पक्क्या घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. कर्जत वगळता उर्वरित तालुक्यांतील 255 पक्क्या घरांचे अंशत नुकसान झाले आहे. तर अलिबाग 1, पेण 2, पनवेल 1, उरण 1, खालापूर 1, महाड 2 आणि पोलादपूर 3 अशा 11 कच्च्या घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे. तर कर्जत वगळता उर्वरित तालुक्यांतील 98 घरांचे नुकसान झाले आहे.

यावर्षीच्या मोसमी हंगामात नैसर्गिक आपत्तीत मृतांच्या वारसांना मदताचे वाटप करण्यात आले आहे. तर घर आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 70 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. सध्या या मदत निधीची वितरणाची प्रक्रिया सुरु आहे.
-सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड जिल्हा