मिशन बिगेन’अंतर्गत आणखी काही बाबींना सूट दुकाने, आस्थापना रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

66

‘मिशन बिगेन’अंतर्गत आणखी काही बाबींना सूट दुकाने, आस्थापना रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

• आठवडी बाजार, गुरांचे बाजार सुरु होणार
• वाचनालये सुरु करण्यासही परवानगी

प्रतिनिधी विनायक सुर्वे

वाशिम : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता देवून १५ ऑक्टोबरपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली असून ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ही नियामवली लागू राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सुरु ठेवण्यास २ तासांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. तसेच स्थानिक आठवडी बाजार, गुरांचे बाजार कंटेंन्मेंट झोनच्या बाहेर भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी याबाबतचे आदेश १५ ऑक्टोबर रोजी निर्गमित केले आहेत.

स्थानिक आठवडी बजार, गुरांचे बाजार आवारात सोशल डिस्टसिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझर वापर, अनिवार्य करण्यात आला आहे. बाजाराच्या आवारात थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी लायब्ररी, वाचनालय सोशल डिस्टसिंग व स्वच्छता याविषयी निर्गमित केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अधीन राहून सुरु करता येणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतच्या आवश्यक सूचना उद्योग विभागामार्फत निर्गमित केल्या जाणार आहेत.

राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व राज्य कौशल्य विकास मिशन अंतर्गत नोंदणीकृत शॉर्ट टर्म प्रशिक्षणे आरोग्य व स्वच्छता विषयी आवश्यक त्या खबरदाऱ्या घेण्याच्या अधीन राहून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य व स्वच्छता संबधीच्या खबरदारी विषयक सविस्तर मार्गदर्शक सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने निर्गमित केल्या आहेत. उच्च शिक्षण संस्थांमधील विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील संशोधन करणाऱ्या (पीएच.डी.) आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची खरीखुरी गरज तपासून प्रयोगशाळा, प्रायोगिक कार्य इत्यादीसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविषयी उच्च शिक्षण विभागामार्फत स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत.

शाळा, महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन शिकवणी पद्धतीस परवानगी राहील. ५० टक्के टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफला ऑनलाईन शिकवणी व इतर अनुषंगिक कामासाठी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थामध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी कंटेंन्मेंट झोनच्या बाहेरील शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्थांसाठी लागू राहील. तसेच आरोग्य व स्वच्छता विषयी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहील. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभाग निर्गमित करणार आहे.