रायगड रणसंग्राम

72
रायगड रणसंग्राम

रायगड रणसंग्राम

रायगड रणसंग्राम

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रायगडमध्ये उत्सुकांचे येणार उधाण

विविध पक्षातर्फे मोर्चेबांधणीला सुरवात, उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता

ॲड.रत्नाकर पाटील

अलिबाग, : लोकसभा निवडणुकांनंतर सर्वच पक्षांना वेध लागलेत ते आगामी विधानसभा निवडणुकांचे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण जिल्ह्यात ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. मागिल २०१९ विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभेद्य होते. मात्र त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी रायगडमध्ये महायुतीसह महाविकास आघाडीत उत्सुकांची संख्या मोठी असल्याने उत्सुकांना उमेदवारी न मिळाल्यास पनवेल, उरण, पेण, कर्जत, अलिबाग मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वर्तविली जात आहे.

………………………….

अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्रशेट दळवी यांनी शेकापचे सुभाष (पंडितशेट) पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर दळवी हे शिंदे गटात डेरेदाखल झाले. या निवडणुकीत शिंदे गटातर्फे विद्यमान आमदार महेंद्रशेट दळवी हे यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. दुसरीकडे शेकापमधून भाजपात गेलेले आणि महायुतीमधील भाजप नेते दिलीप भोईरही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याने भोईरांची वाढती महत्वाकांक्षा शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीची ठरणार आहे. भोईर यांना या मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष किंवा उबाठात प्रवेश करून उबाठातर्फे निवडणूक लढवू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे काँग्रेस नेते वकील प्रविण ठाकूर, शेकापतर्फे चित्रलेखा पाटील, शेकापचे युवा नेते आस्वाद पाटील विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असले, तरी महाविकास आघाडीकडून कोणाच्या गळ्यात माळ प़डणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

……………….

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचा पराभव केला होता. यावेळी शिंदे गट शिवसेनेकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, अजित पवार गटाकडून सुधाकर घारे, तर भाजपतर्फे किरण ठाकरे, महाविकास आघाडीतील उबाठाकडून नितीन सावंत, तर काँग्रेसतर्फे उल्हासराव देशमुख या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

……………….

पनवेल विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी भाजपाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी शेकापतर्फे बाळाराम पाटील, उबाठातर्फे शिरिष घरत उत्सुक असून, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू हे अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीची खरी कसोटी असणार असून, महाविकास आघाडीतर्फे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

…………………………….

उरण विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारलेले महेश बालदी अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. त्यांनी त्यावेळी प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार विवेक पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघातून भाजपातर्फे विद्यमान आमदार महेश बालदी, शेकापतर्फे प्रितम म्हात्रे, उबाठातर्फे मनोहर भोईर, काँग्रेसतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत उत्सुक असल्याचे समजले. याही मतदारसंघात महाविकास आघाडीची खरी कसोटी ठरणार असून, आघाडीतर्फे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

………………………….

पेण-सुधाग़ड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपवासी झालेले रविंद्र पाटील य़ांनी शेकापचे धैर्य़शिल पाटील यांचा पराभव केला होता. धैर्यशिल पाटील यांनीही यावेळी शेकापला रामराम करीत भाजपात डेरेदाखल झाल्याने भाजपाची या मतदारसंघात ताकद वाढली आहे. यावेळी या मतदारसंघातून भाजपातर्फे विद्यमान आमदार रविंद्र पाटील, शेकापकडून अतूल म्हात्रे, भाजपने पक्षातून दूर केलेले प्रसाद भोईर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघात भाजप व शेकापमध्ये थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलिबाग मतदारसंघात महायुतीचा धर्म भाजपाचे दिलीप भोईर यांनी न पाळल्यास याच मतदारसंघाच्या पालीत राहणारे शिंदे शिवसेना गटाचे संघटक प्रकाश देसाईही या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

…………………………………………..

महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले यांनी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव जगताप यांचा पराभव केला होता. सध्या माणिकराव जगताप हयात नसल्याने महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांची मुलगी स्नेहल जगताप यांच्याकडे आली होती; परंतू काही कालांतराने शिवसेना फुटीनंतर स्नेहल जगताप यांनी काँग्रेसला रामराम करीत उबाठामध्ये प्रवेश केल्याने यावेळी उबाठातर्फे महाड-पोलादपूर विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळणार आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार भरत गोगावलेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

…………………………………………….

श्रीवर्धन-म्हसळा या विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार कु. आदिती तटकरे यांनी शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा पराभव केला होता. यावेळी

राष्ट्रवादीत फूट पडल्याने अजित पवार गटाकडून कु. आदिती तटकरे, शरद पवार गटाकडून

अवधूत तटकरे, उबाठाकडून अनिल नवगणे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. याच मतदारसंघातून परत एकदा बाजी मारण्यासाठी अजित पवार गटाच्या कु. आदिती तटकरे यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरवात केल्याचे दिसून येत आहे, तर शरद पवार गट आणि उबाठा गटानेही या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरवात केलेली असली, तरी महाविकास आघाडीकडून कोठल्या उमेदवाराच्या गळ्यात माळ पडते याकडे या मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

…………………………………………………………

चौकट घेणे

………………………………………………………..

रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये या जिल्ह्यात संमिश्र ताकद होती. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले होते. त्यामुळे 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि शेकापला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 2, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या.