उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे डायलेसीस सेंटरचे
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016
अलिबाग,जि.रायगड :- उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील डायलेसीस सेंटरचे आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, सभापती अलका जाधव, सुभाष केकाणे, नगराध्यक्ष आनंद यादव, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, डॉ. दिपक देशमुख, नगरसेवक रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, रवींद्र मोरे, मुहम्मद धुंदवारे, रुपेश तोडकर, विद्युत पर्यवेक्षक संजय गांधी, डॉ. सुनिता कोकणे, मयूर शेठ, रुग्णालय कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, डायलेसिस सुविधा अत्यंत अल्प दरात माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात आली असून आता गरजू रुग्णांना पनवेल वा इतर शहरात जावे लागणार नाही. येत्या वर्षभरात अधिक मशीनरी माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात येतील. श्रीवर्धन, रोहा, पेण, कर्जत येथील येथील उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा लवकरच डायलेसिस सेंटर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या दीड दोन वर्षात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन प्लांट अशा अनेक प्रकारच्या सुविधा माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दुर्दैवाने जर पुढील काळात करोनाची तिसरी लाट आलीच तर त्या परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सक्षम आरोग्य सोयी-सुविधा उभ्या केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रथमच माणगाव उपजिल्हा रुग्णलाय येथे डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यासह श्रीवर्धन, म्हसळा, तळा आजूबाजूच्या तालुक्यातील रूग्णांना याचा लाभ होणार असून आता डायलेसिससाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने रुग्णांना या डायलेसिस सेंटरचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला दररोज 2 रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत डायलेसिस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली.