प्रचारतोफा थंडावल्या, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
📍बुधवारी मतदान, उद्या होणार ‘पोलिंगपार्टी’ रवाना
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 18 नोव्हेंबर
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, 20 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सोमवार, 18 ऑक्टोबरला सायंकाळी 6 प्रचारतोफा थंडावल्या असून, आता गुप्त बैठकांवर, प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे. मात्र, यात कुठलीही आक्षेपार्ह बाब आढळली, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. त्यासाठी प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडाला. या सभांमध्ये सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले. राष्ट्रीय नेत्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. पण, स्थानिक मुद्दे, समस्या कुठे गायब झाल्या कळले नाही. 2019 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत सभांची संख्या घटली.
जिल्ह्यातील सहाही मतदारसंघामध्ये प्रचार फेर्या, जाहीर सभा, कॉर्नर सभा इत्यादींच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार गाजला. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन कल्याण, तर महाआघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, रेवंत रेड्डी, मुकूल वासनिक, कन्हैया कुमार आदी मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या.
जिल्ह्यात एकूण 18 लाख 50 हजार 102 सर्वसाधारण मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 39 हजार 115, तर महिला मतदारांची संख्या 9 लाख 10 हजार 939 मतदार आहेत. तर इतर 48 मतदार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रनिहाय ई.व्ही.एम. यंत्र बसविण्यात येणार असून, अतिरिक्त राखीव यंत्रसुद्धा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. पोलिंगपार्टी प्रत्येक मतदान केंद्रासाठी मंगळवारी रवाना होणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध लागू करण्यात आली असून, त्या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.
जिल्ह्यात 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजेपासून 20 नोव्हेंबरपर्यंत 144 कलम लागू आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान, तगडा पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. राज्य राखीव पोलिस दलासह केंद्रीय पोलिस दल व राज्यााबाहेरील पोलिस जवानांची चमू तैनात राहणार आहे.