नवी मुंबईच्या नेरुळ विभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनधिकृतपणे अनावरण

115

नवी मुंबईच्या नेरुळ विभागात छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याचे अनधिकृतपणे अनावरण

मनसे नेते अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो. क्र.7715918136

पनवेल : नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर एक मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी गनिमी कावा करत अनावरण केले. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे अमित ठाकरे यांनी ठरवुन केलेला शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम महापालिकेने आणि पोलिसांनी अनधिकृत व बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे.

नेरुळ सेक्टर एक मधील चौकाचे नुतनीकरण व सुशोभीकरण करुन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीने जोर धरला होता. त्या अनुषंगाने महापालिकेने देखील पहिल्या टप्प्यात चौकाचे सुशोभीकरण करुन दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला होता. तथापि, हा पुतळा मागील सहा महिन्यांपासून महापालिकेने झाकून ठेवला होता. महाराजांच्या पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करण्यात यावे. अशी मागणी स्थानिक शिवप्रेमी नागरिक करीत होते. याबाबत मागील सहा महिन्यांपासून महापालिकेच्या विविध विभागांकडून पुतळ्याचे लोकार्पण करण्याबाबत विसंगत माहिती मिळत होती. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले. त्यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटनही केले तसेच दहीहंडीच्या दिवशी अनेक नेते मंडळी नवी मुंबईत आले होते. पण त्यांच्यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले नाही. यामुळे स्थानिक नागरिक आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष धुमसत होता.

नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ असलेला शिवरायांचा सदर पुतळा मागील सहा महिन्यांपासून अनावरण न करता कापडाने व प्लॅस्टिकच्या आवरणात झाकून ठेवला होता. त्यामुळे त्या कापडावर मोठ्या प्रमाणात धुळ साचलेली होती. ही बाब सर्वाना खटकत होती. म्हणुन मनसे कार्यकर्त्यांनी याबाबत आंदोलन करण्याचे योजिले होते. यादरम्यान कोपरखैरणे येथे मनसेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पुतळ्याची हकिगत सांगितली. तेव्हा त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह नेरुळ येथे धाव घेतली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी तत्परतेने कार्यकर्त्यांच्या सहाय्याने पुतळ्याच्या भोवती गुंडाळलेले प्लॅस्टिक व कापड काढून धुळीने माखलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला पाण्याने धुऊन स्वच्छ केले. त्यानंतर शिवरायांच्या जयघोषात पुष्पमाला अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पण करण्यात आला असल्याचे जाहीर केले.

तद्नंतर नेरुळ पोलिसांनी जमावबंदीचे उल्लंघन आणि बेकायदेशीर व अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा आरोप करत मनसे नेते अमित ठाकरे, प्रवक्ते गजानन काळे आणि 70 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. ‘ महाराजांसाठी लढणं हा जर गुन्हा होत असेल तर भविष्यातही असे हजारो गुन्हे मी अभिमानाने करेन ‘ अशी स्पष्टोक्ती अमित ठाकरे यांनी यावेळी दिली. त्यांच्या अशा वक्तव्यानंतर समाज माध्यमांवर ह्या रोखठोक पोस्टमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेने चौकाचे सुशोभीकरण अपुर्ण आहे असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्य प्रकारे अनावरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेची व पोलिसांची पुर्व परवानगी न घेता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्याबद्दल नाराजी व्यक्त केली असुन महापालिकेने सोमवारी पुन्हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला कापड गुंडाळून आणि चौकाभोवती कुंपण घालून सदर परिसर झाकून बंदिस्त ठेवला आहे.