स्पॉटलाईट: ओ.आय. सी. ची नसती उठाठेव !

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

ओ आय सी ( ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन ) नावाची एक जागतिक संघटना असून त्या संघटनेत जगभरातील ५७ मुस्लिम देश आहेत. या संघटनेवर सौदी अरेबिया या देशाचे वर्चस्व आहे. या संघटनेचे मुख्यालय देखील सौदी अरेबिया या देशाची राजधानी जेध्दा येथे आहे. या संघटनेचे महासचिव हिसेन ब्राहिम ताहा यांनी काश्मीर संबंधी नुकतेच एक वक्तव्य केले आहे त्यांच्या वक्तव्याचे पडसाद भारतातच नाही तर संपूर्ण जगात उमटत आहेत.

ओ आय सी चे महासचिव ताहा यांनी म्हटले आहे की आमची संघटना काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशांना सोबत घेऊन एक योजना तयार करत असून ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेनुसार ओ आय सी भारतावर दबाव आणून पाकिस्तानशी चर्चा घडवून आणेल या चर्चेत पाकिस्तानला पूर्ण न्याय मिळेल. ताहा यांच्या या वक्तव्याचे जगभर पडसाद उमटू लागताच भारताने ताहा यांना चांगलेच खडसावले आहे. काश्मीर प्रश्नांत डोके खुपसण्याचा अधिकार ओ आय सी ला कोणी दिला ? भारताला न विचारताच ओ आय सी काश्मीर संदर्भात एखादी योजना कशी आखू शकते ? काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असताना ओ आय सी काश्मीरला वादग्रस्त भाग असे का संबोधते? काश्मीर प्रश्नी कोणाचीही मध्यस्थी खपवून घेतली जाणार नाही अशी भारताची भूमिका असताना ओ आय सी भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी का करत आहे? ओ आय सी ला मध्यस्थी करायची असेल तर ती पी ओ के वर अर्थात पाकव्याप्त काश्मीरवर करावी कारण पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून पाकने तो बळजबरीने बळकावला आहे. अशी रोखठोक भूमिका घेऊन भारताने ताहा यांना चांगलेच झाडले आहे. अर्थात भारताने आपली रोखठोक भुमीका मांडल्याने पाकची मात्र चांगलीच गोची झाली आहे कारण ओ आय सी मध्ये काश्मीर प्रश्न गेल्यास भारतावर दबाव येईल असे पाकला वाटले होते मात्र भारताने आता ओ आय सी लाच खडसावल्याने पाक आणि ओ आय सी कोणती भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

वास्तविक काश्मीर प्रश्नांत नाक खुपसण्याची ओ आय सी ला काही गरज नव्हती. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्या संदर्भात कसलीही तडजोड केली जाणार नाही असे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला अनेकदा सांगितले आहे पण तरीही आंतरराष्ट्रीय पटलावर हा मुद्दा उपस्थित करून पाक आपले हसू करून घेतो. पाकच्या नादिला लागून ओ आय सी सारख्या जागतिक संघटना देखील आपले हसे करून घेतात. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असताना काश्मीर हा आपलाच भाग असल्याचा दावा पाकिस्तान करतो आणि त्यासाठी त्यांनी १९६५, १९७१ आणि १९९९ अशी तीन वेळा भारताशी युद्ध छेडले त्याआधी १९४८ साली त्यांनी टोळीवाल्यांचा रुपात आपल्या सैनिकांना काश्मीरमध्ये पाठवून दिले पण प्रत्येक वेळा भारताने त्यांना पाणी पाजले.

समोरासमोर युद्ध करूनही आपण काश्मीर हस्तगत करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी अतिरेक्यांना हाताशी धरून काश्मीर अस्थिर करण्याचा प्रयत्न केला मात्र काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवल्यानंतर अनेक अतिरेकी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी जेरबंद झाले त्यामुळे काश्मीर अस्थिर करण्याचा पाकचा डावही फसला त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पटलावर जिथे जिथे संधी मिळेल तेथे तिथे काश्मीर प्रश्न उकरून कढण्याचा नवा उद्योग पाकने सुरू केला आहे.

 

ओ आय सी च्या महासचिवांचे वक्तव्य हा त्याचाच एक भाग. पण भारतही पाकची ही चाल चांगलीच ओळखून असल्याने पाकिस्तानची ही चालही फसते आणि पाकिस्तानला नामुष्की झेलावी लागते. ओ आय सी असोत की आणखी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना, या आंतरराष्ट्रीय संघटनांनी देखील पाकच्या नादी लागून स्वतःचे हसे करून घेऊ नये कारण काश्मीर प्रश्नी तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी भारत मान्यच करणार नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून यासंदर्भातील कसलीही तडजोड भारतीय नागरिक स्वीकारणार नाही हे ओ आय सी सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी आता तरी ध्यानात घ्यावे.

 

मीडियावार्तावर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, भाष्य, टीका याच्याशी संपादकिय मंडळ व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

मीडियावार्तच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आणि रोजगार अपडेट्स व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी क्लिक करा ⬇️ 

https://linktr.ee/mediavarta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here