ग्रामपंचायत निवडणुक अभूतपूर्व यशानंतर मनसेने लक्ष वेधून घेतलं.

52

ग्रामपंचायत निवडणुक अभूतपूर्व यशानंतर मनसेने लक्ष वेधून घेतलं.

मुंबई :- राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर भाजपा नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीनेच बाजी मारल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या या संपूर्ण निकालात मनसेनेही स्वत:कडे लक्ष वेधून घेतलं आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसतंय. कारण मनवसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुलनेत मनसेने कमी जागा पटकावल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे 9 सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेकडूनही आता प्रतिक्रिया आली आहे.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी फेसबुकद्वारे निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन केले आहे. अनिल शिदोरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं. लोकशाहीचं खरं रूप भेटल्याचा आनंद होतो, अशी भावना अनिल शिदोरे यांनी व्यक्त केली आहे.

तत्पूर्वी, मनसेने एकट्या यवतमाळमध्ये 15 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची 25 वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी 9 पैकी 7 जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने 7 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. रायगडच्या जोहे येथे मनसेचा 1 उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. अजूनही राज्यात ठिकठिकाणी मनसेप्रणित आघाडीचे उमेदवार जिंकल्याची माहिती आहे.

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी 7 पैकी 5 जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे.