पनवेलमध्ये 11 जणांना कोविड लसीकरणाचा त्रास, दोन महिला कर्मचारी रुग्णालयात दाखल.

राज शिर्के
पनवेल :राज्यात दोन दिवसापूर्वी लसीकरणाला सुरुवात झाली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील हे लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 200 जणांना कोविड शील्ड लस देण्यात आली. मात्र यापैकी 11 जणांना या लसीचा त्रास झाला असुन 2 महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी एमजीएम रुग्णालय व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र या लसीकरणाचा बहुतांशी जणांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी 11 जणांची पालिकेकडे नोंद करण्यात आली आहे. दोन महिलांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ देखील आली. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी काही लोकांना त्रास जाणवायला लागले. यामध्ये ताप ,उलट्या आणि अंग दुखीचा त्रास काहींना जाणवला. पहिल्या टप्प्यात 200 जणांना लस देण्यातआल्यानंतर ऍपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण थांबविण्यात आले. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी देखील 11 जणांना लसीकरणाचा त्रास झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अकरा जणांना किरकोळ स्वरूपाचा त्रास आहे. ताप ,अंगदुखी आणि काहींना उलट्या झाल्याचे निदर्शनास आले. 2 महिला कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. उर्वरित सर्वांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहेत.
संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here