11 पैकी 10 जागांवर उमेदवाराचा पॅनलसह विजय, क्रिकेट खेळताना मैदानावर हार्ट अटॅकने निधन झाले.

तासगाव:- सोमवारी ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. यावेळी तासगाव तालुक्यातील ढवळे गावाच्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये अतुल विष्णू पाटील हे 333 मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे शिवशंभू पॅनलही 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवून निवडून आले आहे. विशेष म्हणजे अतुल पाटील यांनी गावातील गट एकत्र करुन बिनविरोध निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना अन्य काही उमेदवारांमुळे 11 जागांसाठी निवडणूक लढवावी लागली. त्यातील 10 जागांवर त्यांना विजयही मिळाला. मात्र, हा विजय साजरा करण्यासाठी आज अतुल पाटील जगात राहिले नाहीत.

क्रिकेटच्या मैदानात आला होता हृदय विकाराचा झटका

शनिवारी 16 जानेवारी सांगलीतील आटपाडी येथे क्रिकेटच्या मैदानावर यष्टीरक्षण करताना अतुल पाटील यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यामुळे जरी त्यांचा पॅनल ग्रामपंचायत निवडणूकीत जिंकला असला, तरी त्याला अतुल यांच्या निधनाने दु:खाची किनार लागली आहे. अतुल पाटील हे खासदार संजय पाटील समर्थकही होते. तसेच ते ढवळी गावचे माजी उपसरपंच होते. यंदा त्यांना सरपंचपदही मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्याआधीच त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ढवळी गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धा खेळायला गेले होते

सांगली जिल्ह्यात दरवर्षी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा या स्पर्धा आटपाडी येथे होत्या. त्यामुळे तासगाव तालुक्याच्या संघाकडून अतुल खेळत होते. त्यावेळी यष्टीरक्षण करताना त्यांना अचानक चक्कर आली. प्रथम दर्शनी त्यांना चेंडू लागला, असा अनेकांचा समज झाला. मात्र, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले. ही घटना शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास घटली. अतुल यांचे तासगाव आणि ढवळी येथे औषधांचे दुकानही होते. तसेच ते सांगली जिल्ह्याच्या केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here