कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत

सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली

                       –  उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबई, दि. 17 : बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं  मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, वर्ष 1956 मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील.

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, दि. 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद, तर अडिचशेहून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here