नागपुरातल्या कळमेश्वर गोवरी पुलाचे झाले उदघाटन, पावसाळयात होणाऱ्या दुर्घटना टळणार

नागपुरातल्या कळमेश्वर गोवरी पुलाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उदघाटन

नागपुरातल्या कळमेश्वर गोवरी पुलाचे झाले उदघाटन, पावसाळयात होणाऱ्या दुर्घटना टळणार

✒️ युवराज मेश्राम ✒️

नागपुर जिल्हा प्रतिनिधी – 📲 9923296442

नागपूर:- कळमेश्वर जवळील गोवरी रस्त्यावरील 3 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले.

या पुलामुळे सिल्लोरी, बोरगाव, तोंडाखैरी येथील ग्रामस्थांना दळणवळणासाठी हा मार्ग सोयीचा होणार आहे. नाबार्डच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या या पुलाची रुंदी 30 मिटर राहणार असून सद्यस्थितीत असलेल्या पुलाच्या 8 फुट उंच राहणार आहे. पावसाळयातील होणाऱ्या र्दुदैवी घटना यामुळे घडणार नाही, असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

बांधकामामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. गौडखैरी ते सावनेर रस्त्यावर वळणावरती नावाचे फलक सुध्दा लावणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

यानंतर पिल्कापार येथील तलावाची पाहणी श्री. केदार यांनी केली. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री.सयाम यांचे कडून तलावाची सिंचन क्षमता, मत्स्य पालनासोबतच कालवे व सहकालव्यांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे. पावसाळयात या तलावाचे पाणी बाहेर जाते त्यासाठी तलावाच्या मर्यादेत वाढ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ग्रामीण भागात पांदन रस्त्याची शेतकऱ्यांना जास्त गरज असते, पांदन हा माझा जिव्हाळयाचा विषय असून त्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तद्नंतर सावनेर येथील पिंपळा डाकबंगला येथे जिल्हा खनिज निधी 2019-20 मधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बांधण्यात आलेल्या विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन श्री. केदार यांच्या हस्ते झाले. त्यांनी अत्याधूनिक संगणकासह असलेल्या प्रयोग शाळेची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. या प्रयोग शाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळून यातून एखाद्या शास्त्रज्ञ उदयास येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

बाबा आमटे युवा पार्क, पिंपळा डाकबंगला येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन त्यांनी केले. भानेगाव, रोहणा व केळवद येथील भूमीपूजन श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

या दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, सावनेर पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे, कळमेश्वर नगरपरिषदेच्या जोत्सना मंडपे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, दादा भिंगारे, वासुदेव निंबाळकर, बाबाराव पाटील, मालती वसु, जिल्हा परिषद व पचायत समीती सदस्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व ‍जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here